कॅन्सरचा सामना करणारी प्रसिद्ध अभिनेत्री मालिकेत करणार कमबॅक? म्हणाली- "डॉक्टरांनी होकार दिल्यावर..."
By देवेंद्र जाधव | Updated: July 8, 2025 13:52 IST2025-07-08T13:50:00+5:302025-07-08T13:52:21+5:30
लिव्हर कॅन्सरशी झुंज देणारी प्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा एकदा टीव्ही इंडस्ट्रीत कमबॅक करण्यास उत्सुक आहे. अभिनेत्रीने चाहत्यांना याविषयी अपडेट दिले आहेत

कॅन्सरचा सामना करणारी प्रसिद्ध अभिनेत्री मालिकेत करणार कमबॅक? म्हणाली- "डॉक्टरांनी होकार दिल्यावर..."
एका अभिनेत्रीविषयी एक बातमी समोर आली आहे. ही अभिनेत्री सध्या कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे दीपिका कक्कर. 'ससुराल सिमर का' या मालिकेमुळे घराघरात प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री दीपिका कक्कर इब्राहिम लिव्हर कॅन्सरवर यशस्वी उपचार घेऊन आता हळूहळू आयुष्यात स्थिरस्थावर होत आहे. काही महिन्यांपूर्वी दीपिकाला लिव्हर ट्युमर असल्याचं निदान झालं होतं आणि तातडीने शस्त्रक्रिया करून तिचा ट्युमरचा काही भाग काढण्यात आला होता. आता या गंभीर आजाराशी झुंज देऊन दीपिका टेलिव्हिजनवर पुन्हा कमबॅक करणार असल्याची चर्चा आहे.
दीपिका पुन्हा टीव्हीवर परतणार?
नुकतंच दीपिकाला तिच्या एका चाहत्याने विचारले की, "तुम्ही पुन्हा टीव्हीवर कधी येणार?" त्यावर उत्तर देताना दीपिका म्हणाली, "मी परत येणार आहे. पण सध्या माझी तब्येत सर्वात महत्त्वाची आहे. मी आता माझी परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारतेय. जेव्हा मी पूर्णपणे बरी होईन, तेव्हा मी पुन्हा काम सुरू करेन." दीपिका सध्या तिचा मुलगा रुहानला पुरेसा वेळ देत आहे. त्याचं संगोपन, स्तनपान, त्याच्यासोबतचे क्षण या सर्व गोष्टी तिला खूप महत्त्वाच्या वाटतात. ती म्हणाली, "मी सध्या जाणीवपूर्वक एक आई म्हणून जगतेय. पण माझं अभिनयाचं प्रेम तसंच आहे. याविषयी डॉक्टरांशी चर्चा सुरु आहेत. मी परत नक्की येईन, पण तब्येत ठीक झाल्यावरच."
दीपिकाच्या चाहत्यांना उत्सुकता
सध्या दीपिका वाचन, थोडासा व्यायाम, योगा आणि मेडिटेशन या गोष्टींमध्ये स्वतःला व्यस्त ठेवतेय. ती सांगते की, आजारपणामुळे तिला जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी दिली आहे. आता ती अधिक जागरुक, कृतज्ञ आहे शिवाय जीवनातील प्रत्येक क्षण अधिक खोलवर अनुभवते आहे. दीपिकाचा हा संयम आणि सकारात्मक दृष्टीकोन चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कॅन्सरवर मात करून ती पुन्हा टीव्हीवर येण्यासाठी सज्ज होत असल्याचं तिने सांगितलं आहे. डॉक्टरांशी मार्गदर्शन करुन टीव्हीवर शानदार कमबॅकसाठी दीपिका आणि तिचे चाहते उत्सुक आहेत.