'मन वाईत गेलं गं!' साताऱ्याच्या दोन लेकींची जमली गट्टी; अश्विनी महांगडेची सविता प्रभुणेंसाठी खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 10:30 IST2025-12-26T10:28:57+5:302025-12-26T10:30:06+5:30
Actress Ashwini Mahangade : 'स्वराज्यरक्षक संभाजी' आणि 'आई कुठे काय करते' यांसारख्या मालिकांतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे सध्या तिच्या एका खास सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

'मन वाईत गेलं गं!' साताऱ्याच्या दोन लेकींची जमली गट्टी; अश्विनी महांगडेची सविता प्रभुणेंसाठी खास पोस्ट
'स्वराज्यरक्षक संभाजी' आणि 'आई कुठे काय करते' यांसारख्या मालिकांतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे सध्या तिच्या एका खास सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. निमित्त ठरलंय ते म्हणजे, ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभुणे यांच्यासोबतची तिची पहिली भेट. साताऱ्याच्या या दोन गुणी लेकींची भेट 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेच्या सेटवर झाली आणि या भेटीचा किस्सा अश्विनीने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
अश्विनीने आपल्या पोस्टमध्ये गावाविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. ती म्हणते, "कलाक्षेत्रात आल्यापासून अनेकदा विचारलं जातं की तुमचं गाव कोणतं? माझं गाव पसरणी, जे वाईपासून ३ किमीवर आहे. अनेकदा लोक मला विचारायचे की, सविता प्रभुणे माहीत आहेत का? त्याही वाईच्याच आहेत, कधी भेटलाय का त्यांना?" अश्विनीने यापूर्वी सविता ताईंची भेट घेतली नव्हती, पण मनात एक इच्छा होती की जेव्हा भेटू तेव्हा अभिमानाने सांगेन की मी सुद्धा वाईची आहे.
ही बहुप्रतिक्षित भेट अखेर 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेच्या सेटवर दुपारच्या जेवणावेळी झाली. सुरुवातीला अश्विनी थोडी साशंक होती. "त्या कशा बोलतील, आपण जास्त बोलायला नको, त्यांना आवडलं नाही तर?" असे अनेक विचार तिच्या मनात सुरू होते. मात्र, सविता प्रभुणे यांनी अश्विनीला पाहताच गोड हसून तिचे स्वागत केले. सविता ताईंनी येताच विचारले, "तीन दिवस झाले तुझी वाट पाहतेय, तू वाईची ना?" हा प्रश्न ऐकताच अश्विनीचा सगळा संकोच दूर झाला. त्यानंतर पुढचा अर्धा तास सविता प्रभुणेंनी अश्विनीचा हात धरून वाईच्या गल्ल्यांमधील अनेक किस्से अशा प्रकारे सांगितले, जणू काही त्या दोघी मैत्रिणी गावाची सफर करत आहेत.
एकाच कॉलेजच्या विद्यार्थिनी आणि सामायिक आवड
या गप्पांच्या ओघात एक रंजक गोष्ट समोर आली, ती म्हणजे या दोन्ही अभिनेत्री एकाच कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी आहेत. वाईच्या किसनवीर महाविद्यालयातून दोघींनीही शिक्षण पूर्ण केले आहे. इतकेच नाही तर, दोघींच्याही जिवाभावाचा विषय असलेला 'खामकर पेढे' हा मुद्दाही त्यांच्या गप्पांचा केंद्रबिंदू ठरला."माणूस कामानिमित्त बाहेर असला तरी त्याच्या मनात वसलेलं गाव किती गोड असतं, हे सविता ताईंना भेटून जाणवलं," अशा शब्दांत अश्विनीने आपल्या भावना व्यक्त केल्या. 'मन रानात गेलं गं' ऐवजी 'मन वाईत गेलं गं' असं म्हणत अश्विनीने या भेटीचा आनंद साजरा केला आहे. आता मी अभिमानाने सांगू शकते की मी त्यांना भेटले, अशा ओळीने तिने आपल्या पोस्टचा शेवट केला आहे.