'उडने की आशा' मालिकेसाठी कलाकारांनी गिरविले मराठी भाषेचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 07:49 PM2024-02-13T19:49:54+5:302024-02-13T19:50:09+5:30

‘उडने की आशा’या नव्या मालिकेचा रंजक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या मालिकेत कंवर ढिल्लन आणि नेहा हसोरा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Actors took Marathi language lessons for 'Udne Ki Asha' series | 'उडने की आशा' मालिकेसाठी कलाकारांनी गिरविले मराठी भाषेचे धडे

'उडने की आशा' मालिकेसाठी कलाकारांनी गिरविले मराठी भाषेचे धडे

स्टार प्लस वाहिनीवर लवकरच उडने की आशा ही नवीन मालिका दाखल होत आहे. या मालिकेत सचिन आणि सायली यांच्या प्रेमाची गाथा आणि नातेसंबंधांची गुंतागुंत  पाहायला मिळणार आहे. या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच त्याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहेत. मालिकेच्या निर्मात्यांनी या मालिकेचा एक रंजक प्रोमो प्रदर्शित केला आहे, ज्यात प्रेक्षकांना सचिन आणि सायलीच्या आयुष्याची झलक पाहायला मिळेल आणि त्यांच्या आयुष्यात सामोरे जावे लागणाऱ्या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात, हे पाहायला मिळणार आहे.

एकीकडे सायली जबाबदाऱ्यांचे महत्त्व जाणणारी व्यक्ती आहे, तर दुसरीकडे सचिन बेफिकीर वृत्तीचा आहे. सचिन आणि सायली या अत्यंत दोन भिन्न प्रवृत्तीच्या व्यक्ती एकत्र आयुष्य व्यतीत करण्याचा- लग्नाचा निर्णय कसा घेतात हेही या मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळेल. सचिन आणि सायली त्यांच्या भावनिक प्रवासाला कसे सामोरे जातात हे पाहणे औत्सुक्यपूर्ण ठरेल. सचिन आणि सायली परस्परांना स्वातंत्र्य देतील का, या प्रश्नाचे उत्तर या मालिकेत दडलेले आहे.  

या मालिकेतील नेहा हसोरा ऊर्फ सायलीने सांगितले की, "मी सायली ही व्यक्तिरेखा साकारत आहे. सायली ही एक मेहनती मुलगी आहे, जी तिच्या कुटुंबाला आधार देण्याकरता प्रत्येक काम, प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडते. तिचा संसार हा तिचा प्राधान्यक्रम आहे. सायलीला तिच्या पतीत काही गुण असावेत, असे वाटते. आयुष्याचा जोडीदार म्हणून तिला सचिन लाभला आहे. ज्याचे गुण, स्वभाव, प्रवृत्ती सायलीच्या स्वप्नातील जोडीदारापेक्षा अगदीच विरोधी आहे. सायलीची भूमिका परिपूर्णतेने वठविण्याकरता मी मराठी शब्दकोशाचा बारकाईने वापर केला. सायली फुलविक्रेती असल्याने फुलांचे हार कसे बनवायचे तेही मी शिकले. हा एक वेगळा अनुभव आहे आणि मी या मालिकेचा एक भाग असल्याबाबत मी कृतज्ञ आहे. ही भूमिका वठवण्याची संधी प्राप्त झाल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान मानते."

तर कंवर ढिल्लन म्हणाला की, "मी या मालिकेत सचिनची व्यक्तिरेखा साकारणार आहे; तो वेगळ्या वातावरणात वाढला आहे. त्याच्या आईने त्याला नाकारल्याने सचिनचे संगोपन त्याच्या आजीने केले आहे. सचिनला अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. तो त्याच्या वडिलांच्या निकट आहे. सचिनचा लग्न आणि प्रेमावर विश्वास नसून तो बेफिकीर वृत्तीचा आहे. मुंबईत लहानाचा मोठा झाल्याने मला मराठी भाषा शिकणे आणि मी जे पात्र साकारत आहे, ते पात्र अधिक अस्सलपणे वठवणे सोपे झाले. सचिनची भूमिका माझ्या नशिबात होती आणि ही भूमिका साकारण्यात व मालिकेचा भाग होण्यात मी खरोखरच स्वत:ला धन्य मानतो. ‘उडने की आशा’ही एक विशिष्ट कथानक असलेली अनोखी मालिका आहे, जी प्रेक्षकांना त्यांच्या टीव्हीच्या पडद्यावर नक्कीच खिळवून ठेवेल.”

Web Title: Actors took Marathi language lessons for 'Udne Ki Asha' series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.