'जुळून येती रेशीमगाठी'मधील 'ही' अभिनेत्री ललित प्रभाकरला मानते भाऊ, दरवर्षी साजरं करते रक्षाबंधन
By देवेंद्र जाधव | Updated: August 6, 2025 17:10 IST2025-08-06T17:07:45+5:302025-08-06T17:10:19+5:30
'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीने ललितला भाऊ मानलं असून ती त्याला राखी बांधून दरवर्षी रक्षाबंधन साजरं करते. कोण आहे ती?

'जुळून येती रेशीमगाठी'मधील 'ही' अभिनेत्री ललित प्रभाकरला मानते भाऊ, दरवर्षी साजरं करते रक्षाबंधन
रक्षाबंधन ९ ऑगस्टला साजरं होणार आहे त्यानिमित्त हा खास किस्सा. ललित प्रभाकर हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून ललितने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. या मालिकेतून ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी ही फ्रेश जोडी इंडस्ट्रीला मिळाली. दोघेही सध्या करिअरच्या शिखरावर आहेत. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतील अशाच एका अभिनेत्रीने ललित प्रभाकरला भाऊ मानलं असून ती आजही त्याच्यासोबत रक्षाबंधन साजरं करते. कोण आहे ही अभिनेत्री?
ही अभिनेत्री ललितला मानते भाऊ
'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतील एक अभिनेत्री दरवर्षी ललितसोबत रक्षाबंधन साजरं करते. ही अभिनेत्री आहे शर्मिष्ठा राऊत. ललित आणि शर्मिष्ठा या दोघांनी 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेत भाऊ-बहिणीची भूमिका साकारली होती. ऑन स्क्रीन भाऊ - बहिणीची भूमिका साकारताना या दोघांचं नातं इतकं घट्ट झालं की त्यांनी ऑफ स्क्रीनही रक्षाबंधन करायचा निर्णय घेतला. शर्मिष्ठा दरवर्षी जमेल तसं रक्षाबंधन आणि भाऊबीजेला ललितला ओवाळताना दिसते. दोघांनी खऱ्या आयुष्यातही एकमेकांना भाऊ-बहिण मानलं आहे.
शर्मिष्ठाने पहिली कमाई ललितला दिली
शर्मिष्ठाला जेव्हा करिअरची सुरुवात केली होती तेव्हा तिने ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केलं होतं. त्यावेळी तिला २५० रुपयांचं मानधनाचं पाकिट मिळालं होतं. शर्मिष्ठाने ते पाकिट अनेकवर्ष जपून ठेवलं होतं. त्यानंतर तिने ललित प्रभाकरचा 'आनंदी गोपाळ' सिनेमा पाहिला. या सिनेमात ललितने केलेला अभिनय शर्मिष्ठाला इतका आवडला की तिने आयुष्यातील पहिली कमाई अर्थात २५० रुपयांचं ते पाकिट ललितला भेट म्हणून दिलं. 'आनंदी गोपाळ' पाहून शर्मिष्ठाने तिची पहिली कमाई देऊन जणू ललितच्या अभिनयाचा गौरव केला. आजही ललितने ते पाकिट जपून ठेवलंय.