कबुतरखान्याच्या मुद्द्यावर अभिनेत्याने मंगलप्रभात लोढांवर साधला निशाणा, म्हणाला- "मुंबईचे पालकमंत्री असूनही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 18:55 IST2025-08-05T18:54:44+5:302025-08-05T18:55:59+5:30
दादरमधल्या कबुतरखान्यावर पालिकेने केलेल्या कारवाईचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहे. अभिनेता अभिजीत केळकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर निशाणा साधला आहे.

कबुतरखान्याच्या मुद्द्यावर अभिनेत्याने मंगलप्रभात लोढांवर साधला निशाणा, म्हणाला- "मुंबईचे पालकमंत्री असूनही..."
मुंबईतील दादर पश्चिम येथील कबुतरखान्याचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने मुंबईतील कबुतरखाने हटवण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. त्यानंतर दादरमधल्या कबुतरखान्यावर पालिकेने कारवाई केली आहे. या कारवाईचे पडसाद आता राजकीय वर्तुळात देखील उमटताना दिसत आहे. दरम्यान आता बिग बॉस मराठी फेम अभिनेता अभिजीत केळकर(Abhijeet Kelkar)ने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांच्यावर निशाणा साधला आहे.
अभिजीत केळकरने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहिले की, ''मंगलप्रभात लोढा हे स्वतः मुंबईचे पालकमंत्री असूनही मुंबईकरांच्या आरोग्याचा विचार न करता दादरच्या कबुतरखान्यासंदर्भात महानगरपालिकेला पत्र देतात हे अत्यंत दुर्देवी आहे.'' त्याने ही पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ''कबुतरांच्या विष्ठेमुळे, त्यातील अत्यंत घातक अशा विषाणूंमुळे, कधीही बरे न होणारे गंभीर आजार होऊ शकतात हे सिद्ध होऊनही, केवळ एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावू नयेत म्हणून एका शहराच्या पालकमंत्र्याने, अतिशय योग्य निर्णय घेतलेल्या महानगरपालिकेला पत्र देऊन, तो बदलायला भाग पाडणं ह्यासारखं दुर्दैव नाही.'' त्याची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
यापूर्वीही अभिनेत्याने शेअर केलेली पोस्ट
या पोस्टच्या आधी अभिजीत केळकरने दादर कबुतरखान्याचा व्हिडीओ शेअर करत एक पोस्ट शेअर केली होती. त्याने लिहिले की, ''काहीच दिवसांपूर्वी दादरच्या कबूतरखान्याचा हा व्हिडीओ, हा व्हिडीओ शूट करतानाच माझा भयंकर संताप झाला होता... भूतदया वगैरे सगळं मलाही आहेच, मलाही प्राणी, पक्षी अतिशय प्रिय आहेत पण कबूतर ह्या पक्षांमुळे श्वसनाचे बरे न होणारे गंभीर विकार, आजार होतात हे सिद्ध होऊनही, मुंबई महानगरपालिकेने वारंवार सचेत करूनही, सूचना देऊनही लोकांना अक्कल येत नाही... कबुतर हा पक्षी कुठल्या एका धर्माचा पक्षी त्यांना वाटत असेल तर तो त्यांनी आपल्या घराला जाळ्या लावून, घराच्या आत खुशाल पाळावा... आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कुठल्याही पक्षाने, निदान ह्याचे तरी धार्मिक राजकारण न करता,महानगरपालिकेने जी ताडपत्री, शेड घालून, कारवाई केली आहे त्यामागे खंबीरपणे उभे रहावे ही कळकळीची विनंती ... मुंबई महानगरपालिकेचा मला अभिमान वाटतो.''