"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 13:28 IST2025-09-02T13:24:33+5:302025-09-02T13:28:07+5:30
प्रियाची शेवटची मालिका 'तुझेच मी गीत गात आहे' मध्ये अभिजीत खांडकेकर मुख्य भूमिकेत होता.

"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट
सुंदर, गुणी, हसतमुख आणि पडद्यावर खलनायिका साकारणारी अभिनेत्री प्रिया मराठे (Pirya Marathe) आज आपल्यात नाही यावर कोणाचाच अजूनही विश्वास बसत नाहीये. ३१ ऑगस्ट रोजी प्रियाने शेवटचा श्वास घेतला. प्रिया काही महिन्यांपासून कॅन्सरशी लढा देत होती. स्टार प्रवाहवरील 'तुझेच मी गीत गात आहे' ही तिची शेवटची मालिका होती. यामध्ये प्रियाने मोनिका कामत ही निगेटिव्ह भूमिका साकारली होती. अभिजीत खांडकेकरची ती पत्नी होती. प्रियासोबत काम केलेल्या सहकलाकारांना तर तिच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. प्रियाचा सहकलाकार, मित्र अभिनेता अभिजीत खांडकेकरने (Abhijeet Khandkekar) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत काम करताना प्रियासोबतचे अनेक क्षण अभिजीतने कॅमेऱ्यात कैद केले होते. तिचे फोटो, कँडीड व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले,"नावाप्रमाणे सगळ्यांना प्रिय असलेली प्रिया. अजूनही खरंच वाटत नाहीये की तू आता आमच्यात नाहियेस. भावपूर्ण श्रद्धांजली, अकाली एग्जिट वगैरे शब्द तुझ्या संदर्भात वापरले जातायत हे पटतच नाहीये मनाला.
आयुष्य इतकं भरभरून जगणारी तू शेवटच्या अवघ्या २ वर्षात काय काय सहन करून गेलीस ह्याची कल्पना ही करवत नाही. शंतनू तू ज्या धीराने तिच्या बरोबर होतास त्याला तोड नाही. 'लवकर बरी होणार आहेस तू , बरी झालीस की मस्त पार्टी करू' असे आमचे खोटे दिलासे शेवटी निरर्थकच ठरले. तू नसल्याची सवय करून घ्यावी लागणार आहे. तू अजून हवी होतीस प्रिया."
प्रियाच्या अंत्यदर्शनाला अभिजीतही पोहोचला होता. तसंच तिच्या शेवटच्या काळात तो दर दिवशी तिची विचारपूस करायचा. प्रियाने २०२३ सालीच मालिकेतून निरोप घेतला होता. तब्येतीच्या कारणामुळे मालिका सोडत असल्याचं सांगत तिने व्हिडिओ शेअर केला होता. त्यावर अनेकांनी प्रिया तूच चांगलं काम करु शकतेस आणखी कोणी नको अशा चाहत्यांच्या प्रतिक्रिया होत्या. मात्र तेव्हा प्रियाला कॅन्सर झाला होता हे तिने कोणालाच कळू दिले नाही. आज थेट तिच्या निधनाची बातमी समजल्याने चाहत्यांना गहिवरुन आलं आहे.