स्वच्छ भारत कॅम्पेनमध्ये कंगना अवतरली 'लक्ष्मी' अवतारात
By Admin | Updated: August 11, 2016 15:36 IST2016-08-11T10:14:02+5:302016-08-11T15:36:30+5:30
'स्वच्छ भारत' अभियानाअंतर्गत एका व्हिडीओमध्ये अभिनेत्री कंगना राणौत 'लक्ष्मी'देवीच्या रुपात अवतरली असून अमिताभ बच्चन यांनी व्हिडीओस आवाज दिला आहे.

स्वच्छ भारत कॅम्पेनमध्ये कंगना अवतरली 'लक्ष्मी' अवतारात
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - गुणवान अभिनेत्री कंगना राणावतने आत्तापर्यंत विविध भूमिकांद्वारे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. विविध भूमिकांचे आव्हान लीलया पेलणार कंगना राणौत आता एका अनोख्या व चांगल्या अभियानासाठी सज्ज झाली असून त्यात ती चक्क 'लक्ष्मी'देवीच्या रुपात दिसणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये तिला साथ लाभली आहे ती बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांची...
भारत सरकारच्या 'स्वच्छ भारत' अभियानाअंतर्गत बनवण्यात आलेल्या एका जाहिरातीत कंगनाने 'लक्ष्मी' देवीचे रुप धारण केले आहे. स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छतेबद्दल जागृती व्हावी यासाठी एक व्हिडिओ बनवण्यात आला असून त्यात स्वच्छतेचा संदेश देण्यात आला आहे.
आणखी वाचा :
लोकांना कचरा बाहेर फेकण्याची सवयच असते, अनेकवेळा सांगूनही ते आपल्या सवयी बदलण्यास तयार नसतात. त्यामुळे आजबाजूच्या परिसरात कचरा-याचे, घाणीचे साम्राज्य पसरते, परिणामी रोगराई वाढते. याच पार्श्वभूमीवर लोकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सरकारतर्फे हे अभियान चालवण्यात येत असून त्या अंतर्गतच हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.
' जिथे स्वच्छता तिथेच सुख-समृद्धीची देवी लक्ष्मी वसते ' असा संदेश त्यामधून देण्यात आला असून त्यामध्ये कंगना 'लक्ष्मी'देवीच्या रुपात दिसली असून अमिताभ बच्चन यांनी व्हिडीओमध्ये निवेदन केले आहे. अस्वच्छता पसरवणा-यांच्या घरातून लक्ष्मी देवी नाराज होऊन निघून जाते हेही त्यामध्ये दाखवण्यात आले आहे. हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वच्छ भारत हे फक्त पंतप्रधान मोदींचे स्वप्न न राहता सगळ्यांनी भारत स्वच्छ बनवण्यासाठी सहकार्य केले पाहिजे असे आवाहनही या व्हिडिओच्या अखेरीस अमिताभ बच्चन यांनी केले आहे.