"माँ तुझे सलाम...", IPL मॅचदरम्यान सूरजने स्टेडियममध्येच गायलं गाणं, चाहते म्हणाले- भावा जिंकलंस!
By कोमल खांबे | Updated: April 9, 2025 11:45 IST2025-04-09T11:45:12+5:302025-04-09T11:45:36+5:30
IPL सामन्यादरम्यानचे काही व्हिडिओ सूरजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. यामधील एका व्हिडिओत सूरज माँ तुझे सलाम हे गाणं गाताना दिसत आहे.

"माँ तुझे सलाम...", IPL मॅचदरम्यान सूरजने स्टेडियममध्येच गायलं गाणं, चाहते म्हणाले- भावा जिंकलंस!
'बिग बॉस मराठी ५'चा विजेता आणि रील स्टार सूरज चव्हाण कायमच चर्चेत असतो. सूरज सोशल मीडियावरुन त्याच्या चाहत्यांना अपडेट्स देत असतो. लवकरच तो 'झापुक झुपूक' या त्याच्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या 'झापुक झुपूक' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सूरज व्यस्त आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रविवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यासाठी सूरजने हजेरी लावली होती.
IPL सामन्यादरम्यानचे काही व्हिडिओ सूरजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. यामधील एका व्हिडिओत सूरज 'माँ तुझे सलाम' हे गाणं गाताना दिसत आहे. मॅच सुरू असताना स्टेडियममध्ये 'वंदे मातरम' हे गाणं वाजायला लागतं. तेवढ्यातच मोठमोठ्याने सूरजही हे गाणं गात असल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सूरजच्या या व्हिडिओने चाहत्यांची मनं जिंकली आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत त्याचं कौतुकही केलं आहे.
दरम्यान, सूरजचा 'झापुक झुपूक' सिनेमा येत्या २५ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या सिनेमातून सूरजच्या आयुष्यातील संघर्ष आणि रील स्टार होण्यापर्यंतचा प्रवास मांडण्यात आला आहे. केदार शिंदेंनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात जुई भागवत, पुष्कराज चिरपुटकर, दिपाली पानसरे, इंद्रनील कामत, मिलिंद गवळी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.