शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 16:10 IST2025-08-25T16:09:47+5:302025-08-25T16:10:21+5:30
सनी देओलची आर्यन खानसाठी खास पोस्ट, वाचा काय म्हणाला

शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'सीरिजची सर्वांनाच उत्सुकता आहे. आर्यनने या सीरिजमधून दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. नुकताच सीरिजाच प्रीव्ह्यू रिलीज करण्यात आला. पहिल्याच प्रयत्नात आर्यनने सर्वांना प्रभावित केलं आहे. प्रीव्ह्यू मध्ये बॉबी देओलचीही झलक दिसते. शाहरुख आणि सनी देओलचं एकेकाळी भांडण खूप गाजलं होतं. तर आता त्याच सनी देओलने (Sunny Deol) चक्क शाहरुखच्या लेकाचं कौतुक केलं आहे. आर्यनसाठी त्याने खास पोस्ट शेअर केली आहे.
सनी देओल आणि बॉबी देओल दोन्ही भाऊ इंडस्ट्रीत पुन्हा जोमात आहेत. त्यांच्याकडे एकापेक्षा एक सिनेमांच्या ऑफर्स आहेत. बॉबी देओल 'अॅनिमल'मुळे पुन्हा वर आला. तर सनी देओल 'गदर २'मुळे चर्चेत आला. बॉबी देओलची आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये भूमिका आहे. तर दुसरीकडे सनी देओलने इन्स्टाग्रामवर सीरिजचा प्रीव्ह्यू शेअर करत लिहिले, "प्रिय आर्यन, तुझा शो खूपच मस्त वाटतोय. बॉबीकडून खूप कौतुक ऐकलं आहे. तुझ्या वडिलांना नक्कीच खूप अभिमान वाटत असेल. बेटा, तुला खूप खूप शुभेच्छा. चक दे फट्टे."
सनी देओल आणि शाहरुख खानने १९९३ साली 'डर'या सिनेमात एकत्र काम केलं होतं. यामध्ये शाहरुख खलनायक होता. तेव्हा दोघांमध्ये काही कारणावरुन चांगलाच वाद झाला होता. नंतर दोघांनी कधीच एकत्र काम केलं नाही. इतकंच नाही तर कधी त्यांनी समोरासमोर यायचंही टाळलं. अनेक वर्षांनी 'गदर २' पार्टीमध्ये सनी देओल आणि शाहरुख एकमेकांना भेटले. त्यांनी गळाभेट घेतली. जुने रुसवे फुगवे विसरुन त्यांच्यात पुन्हा मैत्री झाली आहे. आपल्या मित्राच्या लेकाच्या पहिल्याच प्रोजेक्टसाठी सनीने आवर्जुन शुभेच्छा दिल्या आहेत.