"पैशांसाठी तत्त्वं विकणार नाही" अभिनेत्यानं तंबाखूच्या जाहिरातीची ऑफर नाकारत मुलांसमोर ठेवला आदर्श
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 15:36 IST2025-12-28T15:35:40+5:302025-12-28T15:36:04+5:30
बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्यानं पैशांची गरज असतानाही तंबाखूच्या जाहिरातीची ऑफर नाकारली.

"पैशांसाठी तत्त्वं विकणार नाही" अभिनेत्यानं तंबाखूच्या जाहिरातीची ऑफर नाकारत मुलांसमोर ठेवला आदर्श
Sunil Shetty Rejected Tobacco Brand Advertisement : एकीकडे बॉलिवूडचे मोठे सुपरस्टार्स कोट्यवधींच्या तंबाखू आणि पान मसाल्याच्या जाहिरातींमध्ये झळकताना दिसतात. या जाहिरातींमधून ते मोठी कमाई करतात. पण, बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्यानं पैशांची गरज असतानाही तंबाखूच्या जाहिरातीची ऑफर नाकारली. तंबाखूची जाहिरात करण्यासाठी अभिनेत्याला ४० कोटींची ऑफर आली होती. पण, "पैशांसाठी तत्त्वं विकणार नाही" असं म्हणत त्याने जाहिरात नाकारली आणि आपल्या मुलांसमोर मोठा आदर्श ठेवला.
तो अभिनेता दुसरा-तिसरा कुणी नाही तर बॉलिवूडचा 'अण्णा' अर्थात सुनील शेट्टी हा आहे. सुनील शेट्टी आपल्या फिटनेसबद्दल जेवढा प्रसिद्ध आहे, तेवढाच तो आपल्या तत्त्वांसाठीही ओळखला जातो. अलीकडेच एका मुलाखतीत सुनील शेट्टीने एक खळबळजनक खुलासा केला. एका तंबाखू उत्पादनाच्या जाहिरातीसाठी त्याला तब्बल ४० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. मात्र, आपल्या मुलांसमोर चुकीचा आदर्श नको म्हणून त्याने ही मोठी ऑफर धुडकावून लावली.
सुनील शेट्टीने सांगितले की, त्याला जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये मिळत होते. पण, त्याने आपली मुलं अहान आणि अथिया यांचा विचार करून नकार दिला. तो म्हणाला, "मला ४० कोटींची ऑफर आली होती. पण मी त्याकडे पाहिले आणि स्पष्ट सांगितले की, तुम्हाला वाटतं मी केवळ पैशासाठी हे काम करेन? कदाचित मला पैशांची गरज असेलही, पण मी ते करणार नाही. मला असं काहीही करायचं नाही, ज्यामुळे अहान आणि अथियाच्या प्रतिमेला तडा जाईल". सुनील पुढे म्हणाला की, "आता कोणाचेही धाडस होत नाही की माझ्याकडे अशा ऑफर्स घेऊन याव्यात".