सुलभा देशपांडे अनंतात विलीन

By Admin | Updated: June 6, 2016 03:00 IST2016-06-06T03:00:08+5:302016-06-06T03:00:08+5:30

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या पार्थिवावर रविवारी संध्याकाळी ६ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Sulabha Deshpande merged with Ananta | सुलभा देशपांडे अनंतात विलीन

सुलभा देशपांडे अनंतात विलीन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या पार्थिवावर रविवारी संध्याकाळी ६ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी संध्याकाळी माहीम येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. रविवारी दुपारी २.३० ते संध्याकाळी ५ या कालावधीत
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते.
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अभिनेता नाना पाटेकर, महेश मांजरेकर, संजय नार्वेकर, आनंद इंगळे, सुनील बर्वे, मोहन जोशी, अरुण काकडे,
विजय गोखले, गिरीश पतके, दीपक करंजीकर, श्रीरंग देशमुख,
अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, प्रेमाताई साखरदांडे, किशोरी शहाणे, निशिगंधा वाड, सोनाली कुलकर्णी, वीणा जामकर, प्रतिमा जोशी, दिग्दर्शक गोविंद निहलानी,
विजय केंकरे, राजीव नाईक, चंद्रकांत कुलकर्णी आदी मान्यवरांनी त्यांना या वेळी आदरांजली अर्पण केली.
तर स्मशानभूमीत सयाजी शिंदे,
नंदू माधव, प्रमोद पवार, सुलभा आर्य आदी मान्यवरांनी
त्यांना अखेरचा निरोप दिला. (प्रतिनिधी)

सुलभा देशपांडे यांच्या निधनाने अभिनयाचे ‘सुप्रीम कोर्ट’ शांत झाले आहे. सुलभा देशपांडे या चतुरस्र कलावंत होत्या. विजय तेंडुलकर यांच्याकडून त्यांनी काही बालनाट्ये लिहून घेतली होती आणि ती सादरही केली होती. त्यांच्या बालनाट्य चळवळीच्या निमित्ताने त्या नाट्य परिषदेच्या संपर्कात आल्या. त्यानंतर नाट्य परिषदेशी त्यांची इतकी जवळीक निर्माण झाली की त्यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची रक्कम परिषदेकडे दिली होती. आमच्यासाठी ही मोठी दाद होती. - मोहन जोशी (अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष)



सुलभामावशीने मला ‘आविष्कार’मध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी सतत प्रोत्साहन दिले. माझी सगळी नाटके त्या पाहायच्या आणि प्रयोग संपल्यावर हळूच कानात महत्त्वाचे काहीतरी सांगायच्या, कौतुक करायच्या. काहीवेळा त्या रागवायच्याही आणि प्रसंगी कानउघाडणीही करायच्या. त्यांनी ‘आविष्कार’ ही संस्था मोठी करण्यासाठी जिवाचे अक्षरश: रान केले. - गिरीश पतके (दिग्दर्शक, ‘आविष्कार’)

बालरंगभूमीविषयी असलेल्या आस्थेपोटी त्यांनी जी काही चळवळ उभी केली ती अधिक महत्त्वाची आहे. आज या चळवळीतून बाहेर पडलेले अनेक कलावंत रंगभूमीवर यशस्वी झाले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आम्ही छबिलदास शाळेत अनेक वर्षे प्रयोग करू शकलो.
- अरुण काकडे
(संचालक, ‘आविष्कार’)

प्रायोगिक रंगभूमीवरून सुलभतार्इंचा सुरू झालेला प्रवास पुढे व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपटांपर्यंत चालत राहिला. ‘रंगायन’ आणि ‘आविष्कार’ या नाट्यसंस्थांच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे.
- रत्नाकर मतकरी
(ज्येष्ठ नाटककार)

गेल्या ४० वर्षांचा आमचा सहवास होता. सुलभाताई गेल्या हे खरे वाटत नाही; पण प्रायोगिक, व्यावसायिक आणि बालरंगभूमी पोरकी झाल्याची भावना आता जाणवत आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व तर लोभसवाणे होतेच; परंतु त्यांचा अभिनयही तसाच लोभसवाणा होता. त्यांच्या भूमिका ताकदीच्या होत्या आणि त्यांचे रंगभूमीवरचे योगदान खूप मोठे होते.
- गंगाराम गवाणकर (मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष)

Web Title: Sulabha Deshpande merged with Ananta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.