कलाकारांनाही लेखणीचा आधार
By Admin | Updated: December 3, 2015 02:55 IST2015-12-03T02:55:10+5:302015-12-03T02:55:10+5:30
बॉडी, अॅक्शन, सौंदर्य सगळ्याच बाबतीत सुपरहिट मानल्या जाणाऱ्या, हृतिक रोशनचे लेखन वाचायची संधी लवकरच त्याच्या चाहत्यांना मिळणार आहे. बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच गोष्टी

कलाकारांनाही लेखणीचा आधार
बॉडी, अॅक्शन, सौंदर्य सगळ्याच बाबतीत सुपरहिट मानल्या जाणाऱ्या, हृतिक रोशनचे लेखन वाचायची संधी लवकरच त्याच्या चाहत्यांना मिळणार आहे. बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच गोष्टी डोक्यात असून, आपण लवकरच लिखाणाला सुरुवात करणार असल्याचे ऋतिकने सांगितले आहे. या पुस्तकात तो त्याच्या बॉडीबिल्डिंगचे रहस्य सांगणार आहे. हृतिकच्या आधीही असा प्रयोग अनेक स्टार्सनी केला आहे. या स्टार्सच्या वेगवेगळया विषयांवरील लिखाणाला वाचकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. अॅक्टरच्या भूमिकेतून रायटरच्या भूमिकेत शिरणाऱ्या अशाच काही स्टार्सच्या प्रवासावर एक नजर....
‘अनयुज्वल : मेमोइर आॅफ ए गर्ल हू कम बॅक फ्रॉम डेड’
‘आशिकी’ सिनेमानंतर अचानक लाइमलाइटपासून दूर गेलेल्या अनु अग्रवालचा जीवन मरणाशी केलेला संघर्ष शब्दबद्ध असलेले पुस्तक म्हणजे ‘अनयुज्वल: मेमोइर आॅफ ए गर्ल हू कम बॅक फ्रॉम डेड’ अनुच्या या आत्मचरित्राची खूप चर्चा झाली होती. अनु या पुस्तकात म्हणते की, ‘मी त्या रात्री जवळजवळ मेलेच होते. ब्रीच कॅँडी हॉस्पिटलमधील लोक अजूनही असे मानतात की, मी जीवंत राहिले हा एक मोठा चमत्कारच आहे. त्यावेळी माझे शरीर ठिकठिकाणी जखमी झाले होते, डोक्यातून रक्त वाहत होते, अंगात सर्वत्र सुया टोचत होत्या, शरीरभर टाके टाकून जखमा शिवण्यात आल्या आणि मला जीवनदान मिळाले.’ ग्लॅमरच्या विश्वात रातोरात स्टार झालेल्या या नायिकेचा संघर्ष जगापुढे यावा व आजाराने कुणी हिंमत हारू नये, यासाठी तिने लेखनीचाच आधार घेतला.
‘मिसेस फन्नीबोन्स’
राजेश खन्नाची मुलगी ट्विंकल खन्नाने अभिनयाबरोबर आपल्या खास ओघवत्या शैलीद्वारे लेखन करून चांगली लेखिका म्हणूनही नाव कमावले आहे. वृत्तपत्रात वेळोवेळी विविध विषयांवर लिहिलेले लिखाण म्हणजेच ‘मिसेस फन्नीबोन्स’ आहे. या पुस्तकाला खूप लोकप्रियता मिळाली. या कॉलमद्वारे ट्विंकलने देश आणि समाजात सुरू असलेल्या तत्कालीन घडामोडींवर उपहासात्मक शैलीत लिखाण केले होते. हे सारे लेख एकत्र करून त्याचे छान पुस्तक तयार करण्यात आले. आता तर हे पुस्तक बेस्ट सेलर पुस्तकांच्या यादीत जाऊन बसले आहे.
अॅँड देन वन डे
अभिनयाचे बादशहा नसिरुद्दिन शहा सर्वांनाच माहीत आहेत. त्यांच्या नैसर्गिक अभिनयाने त्यांचे जगभरात खूप चाहते निर्माण झाले आहेत. त्यांनाही अभिनयासोबत लिखाणाची आवड आहे. म्हणूनच त्यांनी एक दिवस लेखणी हातात ेघेतली. यांच्या आयुष्यातील चढ-उतारांचे भावस्पर्शी चित्रण एका पुस्तकाच्या रूपात शब्दबद्ध केले. ‘अॅँड देन वन डे’ असे त्यांच्या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकाला वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
‘द ग्रेट इंडियन डाएट’
लेखक कलाकारांच्या यादीत नुकत्याच येऊन बसलेल्या सुपरस्टार शिल्पा शेट्टीच्या ‘द ग्रेट इंडियन डाएट’ या पुस्तकानेही वाचकांचे लक्ष आपल्याकडे आकर्षिले आहे. या पुस्तकाद्वारे शिल्पाने वाचकांना सोप्या उपायांद्वारे आणि योग्य आहाराद्वारे फिट रहाण्याच्या टीप्स दिल्या आहेत. पुस्तक लिहिण्यामागे आपल्या आयुष्यातील चढउतार आणि अनुभव चाहत्यांना समजावेत आणि त्यांना यातून ‘मागच्याच ठेच पुढचा शहाणा’ या उक्तीप्रमाणे जागरूक करावे, असा माझा हेतू आहे. ‘आई झाल्यानंतर माझे वाढलेले वजन मी प्रयत्नपूर्वक कमी केले. मी स्वत:ला कसे मेंटेंंन केले असा प्रश्न चाहत्यांकडून नेहमी उपस्थित केला जायचा. तेव्हा एखादे पुस्तक लिहून आपण चाहत्यांचे समाधान का करूनये, असा विचार मी केला आणि हे पुस्तक लिहायला घेतले, असे शिल्पा सांगते.
- bhgyashree.mule@lokmat.com