‘अस्वस्थ करणाऱ्या घटना स्वस्थ बसू देत नाहीत’
By Admin | Updated: February 17, 2017 00:06 IST2017-02-17T00:06:46+5:302017-02-17T00:06:46+5:30
‘संस्कृतीने नटलेल्या अन् इतिहास संपन्न भारतात जेव्हा एखाद्या स्त्रीची अब्रू दिवसाढवळ्या लूटली जातेय तेव्हा मन सून्न होते. त्याहीपलीकडे

‘अस्वस्थ करणाऱ्या घटना स्वस्थ बसू देत नाहीत’
‘संस्कृतीने नटलेल्या अन् इतिहास संपन्न भारतात जेव्हा एखाद्या स्त्रीची अब्रू दिवसाढवळ्या लूटली जातेय तेव्हा मन सून्न होते. त्याहीपलीकडे जेव्हा या अस्वस्थ करणाऱ्या घटनेचे काही मंडळी समर्थन करतात, तेव्हा मात्र मन स्वस्थ बसू देत नाही. आपण एक सेलिब्रेटी आहोत; आपला आवाज ऐकला जाऊ शकतो अशी भावना मनात निर्माण होतेय अन् त्यावर आपसूकच प्रतिक्रिया उमटते,’ असे मत अभिनेत्री ईशा गुप्ता हिने मांडले. देशात घडणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या घटनांविरोधात नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज बुलंद करणाऱ्या ईशाबरोबर तिच्या आगामी ‘कमांडो-२’ या सिनेमाविषयी संवाद साधला असता, तिने मनमोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रश्न : अन्याय-अत्याचारांच्या घटनांविरोधात तू नेहमीच तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करते. यामुळे तुला काही मंडळींशी थेट दुश्मनीही घ्यावी लागली आहे, काय सांगशील?
- बऱ्याचदा इंडस्ट्रीमधील मंडळी अशा घटनांवर प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करतात. परंतु आता असे वाटतेय, की सेलिब्रेटींनी यावर बोलायला हवे. कारण, त्यांचा आवाज ऐकला जाऊ शकतो. माझ्या बाबतीत बोलायचे झाल्यास मला अशा घटना अजिबात स्वस्थ बसू देत नाहीत. कदाचित हा माझ्या कुटुंबाचा माझ्यावरील परिणाम असू शकतो. माझे वडील एअर फोर्समध्ये होते. माझे आजोबाही प्रिन्सिपल होते. त्यांचा माझ्यावर नेहमीच प्रभाव राहिला आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना, मी अशा घटनांचा नेहमीच तीव्र शब्दांत निषेध करीत असते. जर मी चुकीच्या गोष्टींविरोधात आवाजच उठविला नाही, तर माझ्या अभिनेत्री होण्यास काहीच अर्थ उरणार नाही, असे मला वाटतेय.
प्रश्न : तुला बॉलिवूडची ‘अॅँजेलिना जोली’ असे म्हटले जाते; परंतु अद्यापही तुझा तसा अवतार बघायला मिळालेला नाही. आगामी काळात प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण होऊ शकेल..?
- आतापर्यंत माझ्या वाट्याला रोमँटिक भूमिका आल्या आहेत; परंतु मला नेहमीच अॅक्शनपटांविषयी आकर्षण वाटते. त्यामुळे मीही अशाच एखाद्या सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या मी ‘बादशाहो’ची शूटिंग करीत आहे. या सिनेमातील माझ्या भूमिकेविषयी मला फारसे सांगता येणार नसले, तरी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटेल, ती म्हणजे या सिनेमात मी अॅक्शन करताना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
प्रश्न : अक्षयकुमारबरोबर रोमँटिकसिनेमा करायची इच्छा असल्याचे तू बोलली होतीस.
- मला नेहमीच चांगल्या, ‘रफ अॅण्ड टफ’ आणि ‘फुलआॅन अॅक्शन’ भूमिका करण्याची इच्छा आहे. परंतु, जेव्हा सलमान आणि अक्षयकुमार यांच्याबाबत विचार करते, तेव्हा मला त्यांच्यासोबत केवळ रोमँटिकभूमिका करण्याची इच्छा होते. मला असे वाटते, की त्यांनी माझ्यासाठी एखादं गाणं गावं. त्यांच्यासोबत डान्स करावा. माझी ही इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी मी नेहमीच देवाकडे प्रार्थना करीत असते.
प्रश्न : ‘बादशाहो’मध्ये तू अजय देवगणबरोबर दिसणार आहेस. हा अनुभव कसा आहे?
- अजय देवगणचा स्वभाव अॅग्रेसिव्ह असल्याचे मी ऐकून होते; परंतु मला त्याची अद्यापपर्यंत जाणीव झालेली नाही. खरं तर त्यांचा बघण्याचा अंदाज तसा आहे. मात्र, एक व्यक्ती म्हणून त्याच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. या सिनेमात इम्रान हश्मीची महत्त्वाची भूमिका असून त्याच्याबरोबर माझा हा तिसरा सिनेमा आहे. थोडक्यात, अजय, इम्रान यांच्याबरोबर काम करण्याच्या या संधीकडे मी लाइफटाइम अॅचिव्हमेंट या दृष्टिकोनातून बघते.
प्रश्न : ‘रुस्तम’ सिनेमात तू निगेटिव्ह भूमिकेत होतीस. अशा भूमिकांकडे तू कसे बघतेस?
- ‘रुस्तम’ हा सिनेमा बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरला, कारण सिनेमातील सर्वच पात्रे दमदार होती. मी या सिनेमात निगेटिव्ह भूमिकेत झळकले असले, तरी सिनेमातील माझी प्रीती मखिजाची भूमिका अधोरेखित करणारी आहे. त्यामुळे भविष्यात मला पुन्हा अशा प्रकारची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यास त्याला माझा होकार असेल. आतापर्यंतच्या करिअरमध्ये प्रत्येक भूमिकेचे महत्त्व ओळखून ती साकारली आहे. खरे तर निगेटिव्ह भूमिका साकारणे हे खऱ्या अर्थाने आव्हान असते, असे मला वाटते.
प्रश्न : ‘कमांडो-२’ लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाविषयी काय सांगशील?
- पहिल्या ‘कमांडो’ या सिनेमाच्या तुलनेत ‘कमांडो-२’ची कथा खूपच दमदार आणि वेगळ्या धाटणीची आहे. रोमान्स, अॅक्शनने भरपूर असलेल्या या सिनेमातील गाणीही सुपरहिट ठरत आहेत. विद्युत जामवाल याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच अविस्मरणीय आहे. कामाच्या व्यस्ततेमुळे मी अद्याप हा सिनेमा बघू शकलेले नाही. त्यामुळे प्रेक्षकांना हा सिनेमा आवडणार, यात काहीही शंका नाही.