गोष्ट लीना-मंगेशच्या नात्याची

By Admin | Updated: July 25, 2016 02:43 IST2016-07-25T02:43:40+5:302016-07-25T02:43:40+5:30

पती-पत्नी दोघांनी एका नाटकात, सिनेमात काम केल्याचं फारसं पाहायला मिळत नाही. मात्र, जेव्हा ती जोडी एकत्र येते तेव्हा मात्र त्यांची केमिस्ट्री आपसुकच रसिकांनाही तितकीच भावते

The story of Leena-Mangesh's relationship | गोष्ट लीना-मंगेशच्या नात्याची

गोष्ट लीना-मंगेशच्या नात्याची

पती-पत्नी दोघांनी एका नाटकात, सिनेमात काम केल्याचं फारसं पाहायला मिळत नाही. मात्र, जेव्हा ती जोडी एकत्र येते तेव्हा मात्र त्यांची केमिस्ट्री आपसुकच रसिकांनाही तितकीच भावते. मग ते अमिताभ-जया बच्चन असो, धर्मेंद्र-हेमामालिनी, सचिन-सुप्रिया असो.. जेव्हा जेव्हा रियल लाईफ पती-पत्नी एकत्र आले तेव्हा त्यांच्यातील केमिस्ट्री रसिकांवर जादू करून गेली. अशीच एक जोडी सध्या मराठी रंगभूमीवरही नाट्यरसिकांचं मन जिंकतेय. ही जोडी म्हणजे दिग्दर्शक-अभिनेता मंगेश कदम आणि त्यांची पत्नी लीना भागवत यांची. ‘के दिल अभी भरा नहीं’ या नाटकातून ही जोडी रंगभूमी गाजवतेय. याचनिमित्ताने अभिनेत्री लीना भागवत यांच्याशी सीएनएक्सनी साधलेला हा खास संवाद.

‘के दिल अभी भरा नहीं' या नाटकाच्या निमित्ताने तुम्ही एकत्र काम करताहात. याचा किती फायदा होतोय?
- पती-पत्नीच्या नात्यातील ट्युनिंगमुळे एकमेकांना सांभाळून घेणं आपुसकच येतं. नाटकामुळं टुगेदरनेस आलंय. नाटक करताना एखादा सीन करताना रंगमंचावर मंगेशनं खुणावलं, की काही गोष्टी लगेच मी समजून घेते किंवा मी सांगितल्यावर त्या मंगेशलाही पटकन समजतात. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. मात्र, या नाटकाच्या निमित्ताने मंगेश मला प्रत्येक प्रयोगाला गजरा माळणार आहेत. रियल लाईफमध्ये रोज घडत नसलं, तरी प्रयोगाच्या निमित्ताने हा अनुभव नेहमी मिळणार आहे. ‘गोष्ट तशी गंमतीच्या’ या नाटकाच्या निमित्ताने ३०० वेळा बीचवर नेलं, तसं या नाटकाच्या निमित्ताने गजरा माळण्याची फिलिंग खूप ग्रेट आहे...
मंगेश आणि आपल्या नात्यातील एखादी स्पेशल आठवण की जी शेअर करावीशी वाटेल?
- पती-पत्नीचं नातंच असं काही असतं, की एकमेकांना समजून घ्यावं लागतं. तडजोडही करावीच लागते. नवरा-बायकोनं एकमेकांना वेळ देणंही तितकंच महत्त्वाचं असतं. लग्नानंतर आम्ही एक नाटक करत होतो. त्या वेळी बहुतेक व्हॅलेन्टाईन डे होता. तेव्हा मी घरी जायला निघाले. तेवढ्यात मंगेश मागे मागे आले. थोडा वेळ काही कळलंच नाही. तेव्हा त्यांनी विचारलं, आज व्हॅलेन्टाईन डे आहे ना.. म्हटलं हो.. मग त्या वेळी पारले बिस्किट त्यांनी मला देत म्हटलं हे घे व्हॅलेन्टाईन डेसाठी तुला देण्यासाठी माझ्याकडे हे इतकेच आहे. तेव्हाचा तो दिवस ते गेल्या वर्षीचा व्हॅलेन्टाईन डे. आम्ही जेवणाला बसलो होतो तेव्हा मंगेश अचानक उठून गेले. काही वेळ कळेना की काय झालं. अचानक बाहेर येऊन त्यांनी मला डायमंड रिंग व्हॅलेन्टाईन डे गिफ्ट म्हणून दिली.

आजवर विविध भूमिका साकारल्या आहेत, मालिका, नाटकं केलीत, हा अनुभव कसा होता?
- माझ्या नशिबाने मी ज्या-ज्या व्यक्तींसोबत काम केलं ते प्रत्येक जण समजूतदार होते. त्या प्रत्येकानं मला समजून घेतलं. 'अग्निहोत्र', 'एका लग्नाची दुसरी गोष्ट', 'होणार सून मी ह्या घरची'... अशा मालिकांमध्ये काम केलं. प्रत्येक मालिकेचे लेखक, निर्माता, दिग्दर्शक यांनी मला माझी स्पेस दिली. त्यांनी मला कधीही कोणत्या गोष्टीसाठी बंधनं नाही घातली. त्यामुळं मीसुद्धा माझ्या पद्धतीने व्यक्त होऊ शकले. मंदार देवस्थळीला खूप आधीपासून ओळखत होते. पण, कामाचा योग येत नव्हता. 'होणार सून'च्या निमित्ताने तो योग जुळून आला. त्या मालिकेतील माझी भूमिकाही रसिकांना आवडण्यामागे मंदारचा खूप मोठा वाटा आहे. याशिवाय 'फू बाई फू'चा एक सीझन केला. त्या वेळी प्रत्येक स्कीट करताना काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. ती मोकळीक, स्वातंत्र्य मला मिळालं म्हणून ते मी करू शकले. रसिकांनाही ती गोष्ट आवडायची.
‘होणार सून मी ह्या घरची'. या मालिकेवेळी काही काळ आपण दिसला नव्हता. त्या वेळी रसिकांकडून तु्मच्याविषयी सतत विचारणा व्हायची. तो अनुभव कसा होता?
- होणार सून मी... च्या वेळी काही काळ मी आजारी होते. त्यावेळी मी साकारत असलेली भूमिका रसिकांना आवडत होती. त्यामुळे नवीन कलाकार घेऊन पात्र बदलणं निर्मात्यांना योग्य वाटलं नाही. त्यामुळं मी बंगळुरुला जाते, असं दाखवण्यात आलं होतं. त्या वेळी मी नाटकाचा प्रयोग करत असताना सगळे रसिक येऊन विचारणा करायचे. चौकशी करायचे की तुम्ही मालिकेत का दिसत नाहीत. त्या वेळी समजायचं की रसिकांचं आपल्यावर किती प्रेम आहे. लोकांच्या अपेक्षा आपण पूर्ण केल्या पाहिजेत. कुठलाही परफॉर्मन्स देताना शंभर टक्के दिलंच पाहिजे.
रसिकांच्या अपेक्षांचा आपण उल्लेख केलाय, तर 'के दिल अभी भरा नहीं'च्या निमित्ताने आपण विक्रम गोखले आणि रिमा यांना रिप्लेस करताय..तर किती दडपण आणि जबाबदारी वाटते?
- ‘के दिल अभी भरा नहीं' या नाटकात विक्रम गोखले आणि रिमा यांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यांचा अभिनय रसिकांना भावला होता. त्यामुळं पुन्हा हे नाटक रंगभूमीवर आल्यानंतर त्या भूमिकांना न्याय देणं, रसिकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देणं हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक परफॉर्मन्स देताना शंभर टक्के द्यायला हवा, चुकून झालं अशी सबब तुम्हीच देऊच शकत नाही. 'के दिल अभी भरा नहीं' या नाटकातील विक्रम गोखले आणि रिमा यांना कॉपी करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांना रिप्लेस करणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी होती. तुलना होणार हे माहिती होतं. कारण एखादं नाटक बऱ्याच वर्षांनंतर जेव्हा नव्या रूपात येतं तेव्हा जितकी तुलना होत नाही. मात्र, एखादं नाटक लगेच तीन-चार महिन्यांनी येतं तेव्हा रसिक तुलना करतातच.
‘के दिल अभी भरा नही' या नाटकाविषयी आणि त्यातील आपल्या भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल?
- उतार वयातील जोडप्याची कथा या नाटकात मांडण्यात आलीय. नोकरी लागली की आर्थिक गणितं जुळवण्याचा विचार सुरू होतो. त्याप्रमाणे ते करायला सुरुवातही करतात; मात्र हे सगळ करत असताना भावनिक गोष्टी दुर्लक्षित होतात. रिटायरमेंटनंतर पेन्शन आणि इतर आर्थिक बाबींचा विचार केला जातो; मात्र भावनिक गोष्टींचा विचार कधी केलाच जात नाही. या नाटकात अरुण आणि वंदना या जोडप्याच्या माध्यमातून उतार वयातील स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेल्या भावनिक गरजांचे महत्त्व पटवून देण्यात आलंय.. या नाटकात साठीची भूमिका साकारलीय. मात्र, ती साकारण्यासाठी काही वेगळं केलं नाही. सुरुवातीला एक दडपण आलं होतं. मात्र, ही भूमिका साकारताना पात्र डोक्यात ठेवलं. माझ्या डोक्यात माझी आई आणि मंगेश यांच्या डोक्यात त्यांचे वडील होते. त्यानंतर केस पांढरे करावे का, मेंहदी लावावी का, असे अनेक प्रश्न होते. मात्र, विक्रम गायकवाड यांनी सांगितलं, की मेकअपपेक्षा पात्र डोक्यात ठेवा आपोआप सारं काही व्यवस्थित होईल. तसं मी करत गेले आणि माझ्यात तो समंजसपणा येत गेला.. प्रेमात भंपकपणा नसतो, हे सांगणारं हे नाटक आहे.
‘होणार सून...’ या मालिकेत अल्लड अशी व्यक्तिरेखा साकारली होती. 'गोष्ट तशी गंमतीची' नाटकात मिडल-एज भूमिका होती,आता साठीतील भूमिका आणि 'गोष्ट तशी गंमतीची' नाटकाचा सिक्वेल येतोय, तर त्यातील लूक कसा असेल?
- गोष्ट तशी गंमतीच्या या नाटकाच्या सिक्वेलच्या चर्चा सध्या प्राथमिक स्तरावर आहेत. मात्र लेखकानं मला सांगितलंय की १०-१५ किलो वजन कम करो.. आता बघू त्याच्या डोक्यात काय आहे.

Web Title: The story of Leena-Mangesh's relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.