इन्कम टॅक्सच्या यादीतही ‘स्टार’
By Admin | Updated: March 28, 2016 00:32 IST2016-03-28T00:32:33+5:302016-03-28T00:32:33+5:30
सध्या मार्च महिना सुरू आहे. व्यावसायिकांपासून बॉलीवूडमधील कलावंतांपर्यंत सर्वच जण इन्कम टॅक्स जमा करण्याच्या कामी लागले आहेत. अनेक मोठे स्टार चित्रपटांसोबतच इतर कार्यक्रमांच्या

इन्कम टॅक्सच्या यादीतही ‘स्टार’
२०१५-१६ आर्थिक वर्षात अक्षय, सलमान टॉपवर
सध्या मार्च महिना सुरू आहे. व्यावसायिकांपासून बॉलीवूडमधील कलावंतांपर्यंत सर्वच जण इन्कम टॅक्स जमा करण्याच्या कामी लागले आहेत. अनेक मोठे स्टार चित्रपटांसोबतच इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपये कमवत असतात. भारतीय चित्रपट कलाकारांचे नाव नेहमी श्रीमंतांच्या यादीत असते. यातील अनेक कलावंत इन्कम टॅक्सच्या यादीतही ‘स्टार’ ठरले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून अक्षय कुमार आणि सलमान खान हे सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्यांमध्ये टॉपवर आहेत. २०१५-१६ या आर्थिक वर्षात सर्वाधिक अॅडव्हान्स टॅक्स भरणाऱ्या बॉलीवूडच्या कलाकारांची माहिती देत आहोत. डिसेंबरपर्यंतची ही आकडेवारी आहे. अर्थात जानेवारी ते मार्च या तिमाहीतील अंतिम आकडेवारी अद्याप आयकर कार्यालयाने जाहीर केलेली नाही. त्यानंतर सर्वाधिक टॅक्स कोणत्या कलाकाराने भरला हे समजेल.
सलमान खान
सलमान खानने २०१५-१६ आर्थिक वर्षात अॅडव्हान्स टॅक्सपोटी २० कोटी रुपये भरले. गत आर्थिक वर्षात सलमान खानने ११ कोटी रुपये भरले होते. सलमानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटाने जगभरात ६०० कोटींचा व्यवसाय केला होता. त्याशिवाय प्रेम रतन धन पायो या चित्रपटाने २०० कोटींचा व्यवसाय केला होता. पुढील वर्षी सुलतान चित्रपटामुळे पुन्हा पहिल्या स्थानावर येण्याची सलमान खानला संधी आहे.
अक्षय कुमार
गतवर्षी अक्षय कुमार १८ कोटी रुपये भरून सर्वाधिक आयकर भरणारा कलाकार बनला होता. २०१५-१६ च्या आर्थिक वर्षात अक्षय कुमारने अॅडव्हान्स टॅक्सपोटी १६ कोटी रुपये भरले आहेत. एअर लिफ्टसारख्या चित्रपटाने यंदा जोरदार व्यवसाय केला आहे. यंदा तो दुसऱ्या स्थानावर आहे.
रणबीर कपूर
गतवर्षी रणबीर कपूरने ४ कोटी रुपये टॅक्स भरला होता. २०१५-१६ च्या आर्थिक वर्षात रणबीर कपूरने अॅडव्हान्स टॅक्सपोटी १५ कोटी रुपये भरले आहेत. तमाशा, बॉम्बे वेल्व्हेट हे चित्रपट गाजले. गतवर्षी तो सहाव्या स्थानावर होता. यंदा तो तिसऱ्या स्थानावर आला आहे.
शाहरुख खान
शाहरुख खानचा यावर्षी दिलवाले हा चित्रपट चांगलाच गाजला. २०१५-१६ च्या आर्थिक वर्षात शाहरुख खानने अॅडव्हान्स टॅक्सपोटी १४ कोटी रुपये भरले आहेत. गतवर्षी शाहरुखने १०.५ कोटी रुपये टॅक्स भरला होता.
अमिताभ बच्चन
‘केबीसी’मुळे गेल्या आर्थिक वर्षात ५ कोटी रुपये टॅक्स भरणारे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी २०१५-१६ च्या आर्थिक वर्षात अॅडव्हान्स टॅक्सपोटी ८.७५ कोटी रुपये भरले आहेत. यावर्षी त्यांचे पिकू, वझीर हे चित्रपट फारसे चालले नाहीत.
आमीर खान
आमीर खानने मागील वर्षी ४.५ कोटी रुपये भरून पहिल्या पाच जणांमध्ये स्थान मिळविले होते. आमीरचा यावर्षी बहुचर्चित दंगल हा चित्रपट येतो आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी त्याला आणखी पुढे जाण्याची संधी आहे.
ऐश्वर्या रॉय-बच्चन
ऐश्वर्या रॉयने बरेच दिवस झाले इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. त्यामुळे गत आर्थिक वर्षात तिने ३ कोटी रुपये आयकर भरला होता. तिचा सरबजीत हा चित्रपट यावर्षी येतो आहे. हा चित्रपट चांगला व्यवसाय करेल, अशी तिला अपेक्षा आहे.