चाहत्यांना मोठा धक्का! साऊथ सुपरस्टार थलपती विजयने केली सिनेसृष्टीतून निवृत्तीची घोषणा, भावुक होत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 10:03 IST2025-12-29T10:00:36+5:302025-12-29T10:03:25+5:30
३३ वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीनंतर अभिनेत्याचा सिनेजगताला रामराम, म्हणाला-"माझ्यासाठी फक्त..."

चाहत्यांना मोठा धक्का! साऊथ सुपरस्टार थलपती विजयने केली सिनेसृष्टीतून निवृत्तीची घोषणा, भावुक होत म्हणाला...
Thalapathy Vijay Announce Retirement: मनोरंजन जगतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दाक्षिणात्य अभिनेता सुपरस्टार थलपती विजयने (Thalapathy Vijay) अभिनयातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. थलपती विजयचा तमिळ सिनेसृष्टीसह संपूर्ण भारतात मोठा चाहतावर्ग आहे. रजनीकांत, कमल हासन यांच्यानंतर थलपती विजय हे नाव दाक्षिणात्य सिनेविश्वातील मोठं नाव आहे. त्याची केवळ एक झलक पाहण्यासाठी असंख्य लोकांची गर्दी जमा होते. अशातच ३३ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकीर्दीनंतर त्याने अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.
अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट 'जन नायकन' हा पुढील वर्षी जानेवारीमध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.अलिकडेच या चित्रपटाचा ऑडियो लॉन्च कार्यक्रम मलेशियामध्ये पार पडला. यावेळी अभिनेता खूपच भावूक झालेला पाहायला मिळाला. या कार्यक्रमात त्याने आपण आता अभिनयातून निवृत्ती घेत राजकारणाकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचं म्हटलं आहे. त्याच्या या निर्णयाचा चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, गतवर्षी थलपती विजयने 'तामिळगा वेत्री कळघम' नावाचा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला आणि आता तो २०२६ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. या ऑडिओ लॉन्च कार्यक्रमादरम्यान अभिनेता त्याच्या या निर्णयाबद्दल बोलताना म्हणाला,"माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे. लोक थिएटरमध्ये मला पाहण्यासाठी येतात आणि रांगेत उभे राहतात. म्हणूनच मी पुढील ३०-३३ वर्षे त्यांच्यासाठी रांगेत उभा राहण्यास तयार आहे."पुढे अभिनेता म्हणाला,"मला अगदी पहिल्या दिवसापासूनच सर्व प्रकारच्या टीकेचा सामना करावा लागला आहे. पण माझे चाहते सुरुवातीपासूनच माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत." अशा भावना अभिनेत्याने यावेळी व्यक्त केल्या.
थलपती विजयच्या सिने-कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने वयाच्या १० व्या वर्षी 'वेट्री' या तमिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर १८ व्या वर्षात अभिनेत्याने मुख्य नायक म्हणून 'थीरपू' या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवलं. तेव्हापासून विजयने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. ज्या सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. थलपती विजय हा तमिळनाडूमध्ये अभिनेता म्हणून खूप प्रसिद्ध आहे. हीच बाब त्याला राजकारणात आपले बस्तान बसवण्यासाठी महत्त्वाची आणि मदतीची ठरणार आहे.