थलपती विजयच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ! पत्नीने मागितला घटस्फोट; कोट्यवधींच्या मालमत्तेची रंगतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 17:41 IST2026-03-01T17:41:00+5:302026-03-01T17:41:54+5:30
अभिनेत्यानं अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे त्याची संपत्तीसुद्धा अफाट आहे.

थलपती विजयच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ! पत्नीने मागितला घटस्फोट; कोट्यवधींच्या मालमत्तेची रंगतेय चर्चा
साऊथ स्टार थलपति विजय त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. थलपति विजयची पत्नी संगीताने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. २७ वर्षांच्या सुखी संसारानंतर हे जोडपे आता कायदेशीररित्या वेगळे होणार आहे. यामागे थलपति विजयचं एक्स्ट्रा मरेटियल अफेअर असल्याचं सांगण्यात येत आहे. विजय आता वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असला तरी तो कायम प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिनेत्यानं अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे त्याची संपत्तीसुद्धा अफाट आहे.
थलपति विजयचे अभिनेत्रीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला आहे. एप्रिल २०२१ मध्ये ही बाब समोर आल्यानंतर विजयनं हे संबंध संपवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते सुरूच राहिले. यामुळे तीव्र मानसिक त्रास झाल्याचे संगीतानं याचिकेत म्हटले आहे.संगीताच्या म्हणण्यानुसार, जेव्हा या अफेअरबद्दल विजयला जाब विचारला, तेव्हा त्यांचे वर्तन पूर्णपणे बदलले. विजयने संगीताच्या हालचालींवर मर्यादा आणल्या, तिचे घरगुती अधिकार कमी केले आणि आर्थिक निर्बंधही लादले. मानसिक छळ आणि क्रूरतेचे कारण देत त्यांनं 'विशेष विवाह कायदा, १९५४' अंतर्गत घटस्फोटाची मागणी केली आहे.
२७ वर्षांच्या नात्याचा अंत
विजय आणि संगीता यांचा विवाह २५ ऑगस्ट १९९९ रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार पार पडला होता. या जोडप्याला जेसन संजय आणि दिव्या साशा अशी दोन मुले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून हे दोघेही वेगळे राहत असल्याची चर्चा होती, ज्यावर आता या अर्जाद्वारे शिक्कामोर्तब झाले आहे.
६०० कोटींच्या संपत्तीचा मालक
राजकारणात सक्रिय होत असलेल्या विजयची एकूण संपत्ती अंदाजे ६०० कोटी रुपये आहे. तो भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक असून एका चित्रपटासाठी १०० ते १२० कोटी रुपये घेतो. चेन्नईतील समुद्रकिनाऱ्यावरील आलिशान बंगला, महागड्या गाड्या आणि स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस अशा मोठ्या साम्राज्याचा तो मालक आहे. चित्रपटसृष्टीतून संन्यास घेऊन पूर्णवेळ राजकारणात उतरण्याच्या तयारीत असलेल्या विजयसाठी हा कौटुंबिक वाद राजकीयदृष्ट्याही चिंतेचा विषय ठरू शकतो.