'थलपती' विजय चाहत्यांच्या गर्दीत कोसळला; जीवघेणा प्रसंग थोडक्यात टळला, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 10:30 IST2025-12-29T10:29:20+5:302025-12-29T10:30:42+5:30
Thalapathy Vijay Falls Video: चेन्नई विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली. मलेशियाहून परतलेल्या विजयला पाहण्यासाठी चाहत्यांनी अशी काही तुफान गर्दी केली की, त्या गर्दीत विजयचा तोल गेला आणि तो चक्क जमिनीवर पडला.

'थलपती' विजय चाहत्यांच्या गर्दीत कोसळला; जीवघेणा प्रसंग थोडक्यात टळला, पाहा व्हिडीओ
Thalapathy Vijay Falls: दक्षिण भारतात 'सुपरस्टार विजय' हे दोन शब्दच हजारो-लाखोंची गर्दी खेचण्यासाठी पुरेसे आहेत. 'थलपती' म्हणून लोकप्रिय असलेला विजय सिनेमासृष्टीतल्या यशानंतर आता राजकारणात सक्रीय झालाय. काल त्याचा शेवटचा चित्रपट 'जन नायकन'च्या ऑडिओ लाँचवेळी विजयनं अभिनय क्षेत्रातून निवृत्ती जाहीर केली. चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचे लाखो चाहते दुःखी झाले आहेत. याच दरम्यान चेन्नई विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली. मलेशियाहून परतलेल्या विजयला पाहण्यासाठी चाहत्यांनी अशी काही तुफान गर्दी केली की, त्या गर्दीत विजयचा तोल गेला आणि तो चक्क जमिनीवर पडला. निवृत्तीच्या घोषणेनंतर घडलेल्या या प्रसंगामुळे सध्या चिंतेचं वातावरण पसरलं आहे.
आपल्या ६९ व्या आणि शेवटच्या 'जन नायकन' या चित्रपटाच्या ऑडिओ लाँचसाठी मलेशियाला गेलेला विजय, जेव्हा मायदेशी परतला, तेव्हा चेन्नई विमानतळावर एक भीषण प्रसंग घडला. विजयच्या निवृत्तीची घोषणा कळाल्यानंतर चाहत्यांनी विमानतळावर एकच गर्दी केली. विमानतळाच्या बाहेर पडताना गर्दी एवढी मोठी होती की आपल्या गाडीकडे जाताना विजयचा तोल गेला आणि तो खाली पडला. सुदैवाने, त्याच्या सुरक्षारक्षकांनी त्याला तातडीने उचलले आणि सुरक्षितपणे गाडीत बसवले.
VIDEO | TVK chief Vijay stumbled and fell while trying to get into his car at the Chennai airport.
— Press Trust of India (@PTI_News) December 28, 2025
A large crowd of fans gathered to welcome him as he returned from Malaysia.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/x42Kpd0AsW
मलेशियातील क्वालालंपूर येथे पार पडलेल्या 'जन नायकन'च्या भव्य ऑडिओ लाँच कार्यक्रमात विजयने आपली निवृत्ती जाहीर केली. यावेळी १ लाखांहून अधिक चाहते उपस्थित होते. विजय म्हणाला, "जेव्हा मी या क्षेत्रात आलो, तेव्हा वाटलं होतं की मी वाळूचा एक छोटा किल्ला बांधतोय. पण, तुम्ही माझ्यासाठी एक भक्कम किल्ला उभारलात. आता ज्या चाहत्यांनी माझ्यासाठी सर्वस्व सोडलं, त्यांच्यासाठी उभं राहण्याची वेळ आली आहे. तुमच्यासाठीच मी चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला आहे".
९ जानेवारीला शेवटचा धमाका
विजयचा हा शेवटचा चित्रपट ९ जानेवारी २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. एच. विनोद दिग्दर्शित या चित्रपटात विजयसोबत बॉबी देओल, पूजा हेगडे, ममिता बैजू आणि प्रकाश राज यांसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाच्या ऑडिओ लाँचची नोंद 'मलेशियन बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये करण्यात आली आहे.
सिनेमातून निवृत्ती का घेतली?
विजयनं 'तामिळगा वेत्री कळघम' (TVK) हा नवीन राजकीय पक्ष स्थापन केला असून, आगामी विधानसभा निवडणुकीत तो उतरणार आहेत. त्यामुळे सिनेमासृष्टीतून घेतलेल्या निवृत्तीचं हे पाऊल पूर्णपणे राजकारणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी उचलले आहे.