"प्रभास २५ वर्षांपासून इंडस्ट्रीत, तो ढोंगी...", निधी अग्रवाल अभिनेत्याबद्दल काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 14:32 IST2026-01-21T14:30:11+5:302026-01-21T14:32:15+5:30
'द राजा साब' फेम निधी अग्रवालने प्रभासच्या स्वभावाबद्दल केला खुलासा, म्हणाली...

"प्रभास २५ वर्षांपासून इंडस्ट्रीत, तो ढोंगी...", निधी अग्रवाल अभिनेत्याबद्दल काय म्हणाली?
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा 'बाहुबली' म्हणजेच प्रभास. त्याचा जगभरात चाहता वर्ग असून तो कायम चर्चेत असतो. प्रभास हा त्याच्या साधेपणासाठी ओळखला जातो. अशातच त्याची सहकलाकार निधी अग्रवाल हिने प्रभासबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या ऐकून चाहते थक्क झाले आहेत. "प्रभास हा ५ वर्षांच्या लहान मुलासारखा निष्पाप आहे" असं म्हणत निधीने त्याच्या स्वभावाचे भरभरून कौतुक केले आहे.
निधी अग्रवालने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये प्रभाससोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. ती म्हणाली, "प्रभास अजिबात ढोंगी नाही. त्याच्या वागण्यात कोणतीही कृत्रिमता किंवा राजकारण नसते. मी नेहमी विचार करायचे की, इतकं निष्पाप राहून कोणी सुपरस्टार बनू शकतं का? पण प्रभासला भेटल्यानंतर मला समजलं की, तो जितका मोठा स्टार आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने तो जास्त प्रामाणिक आणि सौम्य आहे".
निधी पुढे म्हणाली, "तो व्यावसायिक विचारसरणीचा व्यक्ती नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्याकडे कोणतीही पीआर टीम नाही. त्याला भेटल्यावर तो २५ वर्षांपासून इंडस्ट्रीत असलेला अभिनेता आहे, याचा विसर पडतो. तो फक्त आपलं काम करतो आणि १०० टक्के देतो. चित्रपटाच्या यश-अपयशाचा त्याच्यावर अजिबात परिणाम होत नाही".
नुकतंच प्रदर्शित झालेला 'द राजा साब' हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. यामध्ये प्रभास आणि निधी अग्रवालसोबत संजय दत्त आणि रिद्धी कुमार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात १०० कोटींच्या कमाईचा टप्पा पार करत धडाकेबाज सुरुवात केली होती. सध्या या चित्रपटाने जगभरात २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. सुरुवातीच्या तुलनेत नंतरच्या काळात कलेक्शनमध्ये काहीशी घट पाहायला मिळाली.