अभिनेत्री विष्णू प्रियाच्या वडिलांची निर्घृण हत्या! हात बांधून तोंडाला लावला होता टेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 14:09 IST2026-02-23T14:06:47+5:302026-02-23T14:09:20+5:30
विष्णू प्रियाचे ७३ वर्षीय वडील सूर्यनारायणन यांची हत्या करण्यात आली. २०१८ मध्ये झालेल्या एका हत्येचा बदला म्हणून ही हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.

अभिनेत्री विष्णू प्रियाच्या वडिलांची निर्घृण हत्या! हात बांधून तोंडाला लावला होता टेप
तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री विष्णु प्रिया हिच्या वडिलांची कोडाईकनालमध्ये निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिचे वडील सूर्यनारायणन (वय ७३) यांचा मृतदेह खासगी बंगल्यात आढळून आला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, डिंडीगुल जिल्ह्यातील कोडाईकनाल येथे कुरिंजी अंदावर मंदिराजवळ असलेल्या बंगल्यात सूर्यनारायणन यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मृतदेह स्विमिंग पूल परिसरातील खुर्चीवर पडलेला होता. त्यांचे हात दोरीने बांधलेले होते आणि तोंडावर टेप लावलेली होती. पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
सूर्यनारायणन यांनी आपल्या बंगल्यातील काही खोल्या पर्यटकांना भाड्याने दिल्या होत्या. या प्रकरणात त्या ठिकाणी राहणाऱ्या पाच तरुणांवर पोलिसांना संशय आहे. दरम्यान, बंगल्यातून सोन्याचे दागिने आणि सीसीटीव्ही यंत्रणाही गायब असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चोरीचा अँगलही तपासात समाविष्ट करण्यात आला आहे. बंगल्यातील दोन कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू असून ते दोघेही दोऱ्यांनी बांधलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती आहे.
ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे. २०१८ मध्ये प्रभाकरन नावाच्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी सूर्यनारायणन यांना अटक करण्यात आली होती. कथितरित्या प्रभाकरन आणि विष्णु प्रिया रिलेशनशिपमध्ये होते, अशी चर्चा होती. मात्र या संदर्भात अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.सध्या पोलिस तपास करत असून घटनेमागील नेमकं कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, विष्णु प्रिया सध्या चेन्नईमध्ये वास्तव्यास आहे.