'कांतारा चॅप्टर १'साठी ऋषभ शेट्टीनं घेतलं तगडं मानधन, आकडा पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 11:31 IST2025-09-30T11:30:11+5:302025-09-30T11:31:20+5:30
अभिनेता ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) सध्या त्याच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'कांतारा चॅप्टर १' (Kantara Chapter 1 Movie)च्या प्रदर्शनाच्या तयारीत व्यग्र आहे.

'कांतारा चॅप्टर १'साठी ऋषभ शेट्टीनं घेतलं तगडं मानधन, आकडा पाहून व्हाल थक्क
अभिनेता ऋषभ शेट्टी (Rishabh Shetty) सध्या त्याच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'कांतारा चॅप्टर १'(Kantara Chapter 1 Movie)च्या प्रदर्शनाच्या तयारीत व्यग्र आहे. अभिनेत्याने केवळ चित्रपटात मुख्य भूमिकाच साकारली नाही, तर त्याने दिग्दर्शनही केलंय. या चित्रपटाला घेऊन प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. या दरम्यान, तुम्हाला माहीत आहे का की, ऋषभ शेट्टीने या प्रोजेक्टसाठी किती मानधन घेतलं आहे?
सियासत डॉट कॉमच्या एका रिपोर्टनुसार, ऋषभ शेट्टीने 'कांतारा चॅप्टर १'मध्ये अभिनय किंवा दिग्दर्शन करण्यासाठी एक रुपयाही घेतलेला नाही. त्याऐवजी, त्याने नफा वाटून घेण्याचा मार्ग निवडला आहे. याचा अर्थ असा की, या चित्रपटातून ऋषभची कमाई पूर्णपणे चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कामगिरीवर अवलंबून असेल. विशेष म्हणजे, 'कांतारा चॅप्टर १' कथितरित्या १२५ कोटी रुपये बजेटवर बनला आहे आणि शेट्टीने यात चांगली रक्कम गुंतवलीही आहे.
'कांतारा चॅप्टर १'बद्दल
'कांतारा: चॅप्टर १' हा कर्नाटकमधील कदंब काळावर आधारित आहे. कदंब हे कर्नाटकाच्या काही भागांचे महत्त्वाचे शासक होते आणि त्यांनी या क्षेत्राच्या वास्तुकला आणि संस्कृतीला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तो काळ भारतीय इतिहासाचा सुवर्णकाळ मानला जातो. २०२३ मध्ये, ऋषभ शेट्टीने घोषणा केली होती की, प्रेक्षकांनी जो चित्रपट पाहिला तो खरं तर भाग २ होता आणि त्यामुळे पुढे जो प्रदर्शित होईल तो 'कांतारा'चा प्रीक्वल असेल. 'कांतारा: चॅप्टर १' हा चित्रपट येत्या २ ऑक्टोबर, २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.
ऋषभ शेट्टीने सांगितला अनुभव
अलीकडेच 'कांतारा चॅप्टर १' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान, ऋषभ शेट्टीने 'कांतारा'मध्ये अभिनय आणि दिग्दर्शनाची दुहेरी आव्हानं स्वीकारण्याबद्दल मोकळेपणाने सांगितले. त्याने आठवण करून दिली की, "काही ॲक्शन सीनमध्ये मी अभिनय करत होतो आणि त्याचवेळी, बॅकग्राउंडमध्ये काही समस्या देखील होत्या." तो म्हणाला की, "मी लगेच माईक पकडून उंचीवर जाऊन कलाकारांशी बोलायचो. तो लगेच अभिनेता आणि दिग्दर्शक यांच्यात बदल व्हायचा. पण मी जी भूमिका साकारत आहे, ती देखील तशीच आहे. त्यामुळे ते नैसर्गिक वाटायचे."