बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 15:52 IST2025-11-06T15:51:44+5:302025-11-06T15:52:14+5:30
अंजली बाई शिंदे आणि आकाश नारायणकर हे लोकप्रिय रीलस्टार कपल खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे पती पत्नी आहेत. आता या मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफवर साऊथमध्ये सिनेमा बनतोय.

बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
अंजली बाई शिंदे आणि आकाश नारायणकर हे लोकप्रिय रीलस्टार कपल खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे पती पत्नी आहेत. आता या मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफवर साऊथमध्ये सिनेमा बनतोय. त्यामुळे अंजली बाई आणि आकाश हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण, हे दोघे नेमके कोण आहेत? आणि यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्यासारखं नेमकं काय घडलंय?
अंजली बाई आणि आकाश हे साधेसुधे कपल नाहीत. तर आजच्या खोट्या जगात खऱ्या प्रेमाचं ते जिवंत उदाहरण आहेत. सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक अंजलीबाईला ब्रेन ट्युमरचं निदान झालं. अंजलीबाईचा एक छोटा अपघात झाला होता. ज्यामध्ये तिच्या डोक्याला सहा टाके पडले होते. या अपघातावेळी एक्सरे आणि एमआरआय केल्यावर डॉक्टरांना अंजलीबाईच्या मेंदूला गाठ असल्याचं निदर्शनास आलं. ही गाठ अंजलीबाईला लहानपणापासून होती. जवळपास सगळ्याच डॉक्टरांनी अंजलीबाई वाचणार नाही असंच सांगितलं होतं. पण, आकाशला त्याच्या प्रेमावर आणि स्वामीकृपेवर पूर्ण विश्वास होता.
आकाशने जिद्द सोडली नाही आणि हार मानली नाही. शक्य तितके प्रयत्न करून त्याने आपली पत्नी अंजलीबाईला मृत्यूच्या दाढेतून परत आणलं. अंजलीबाईवर शस्त्रक्रिया करून मेंदूला असलेली गाठ काढण्यात आली. मात्र यामध्ये तिला अर्धांगवायूचा झटका आला आणि शरीराची एक बाजू निकामी झाली. तरीदेखील आकाशने पत्नीची साथ सोडली नाही. त्याने पत्नीची सेवा केली. आणि यातून आता अंजलीबाई हळूहळू बरी होत आहे. नुकतंच ते आईबाबा होणार असल्याची गुडन्यूजही त्यांनी दिली आहे.
आकाश आणि अंजलीबाई यांच्या या रिअल लाइफ स्टोरीवर साऊथ सिनेमा येत आहे. ज्याचं नाव 'लव्ह यू मुदूदू' असं असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साऊथ अभिनेता सिद्दू आणि अभिनेत्री रेश्मा या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहेत. येत्या ७ नोव्हेंबरला हा कन्नड सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे.