उदयपूरच्या राजवाड्यात घुमणार सनई-चौघडे! रश्मिका आणि विजयच्या लग्नाची तारीख आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 10:04 IST2025-12-30T10:03:59+5:302025-12-30T10:04:30+5:30
काऊंटडाऊन सुरू... रश्मिका आणि विजय देवरकोंडाच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी!

उदयपूरच्या राजवाड्यात घुमणार सनई-चौघडे! रश्मिका आणि विजयच्या लग्नाची तारीख आली समोर
Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत असलेली जोडी म्हणजे विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना. ऑक्टोबर २०२५ मध्ये या जोडीचा साखरपुडा झाल्याचे समोर आले होते. अगदी गुपचूप साखरपुडा उरकल्यानंतर या जोडीने पुढच्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण समोर आले आहे. 'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, हे दोन्ही स्टार्स लवकरच उदयपूरच्या राजवाड्यात लग्नबंधनात अडकणार आहेत.
विजय आणि रश्मिका यांचा विवाह २६ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न होणार आहे. या शाही विवाहासाठी राजस्थानमधील उदयपूरची निवड करण्यात आली आहे. उदयपूरमधील एका अत्यंत आलिशान आणि ऐतिहासिक राजवाड्यात हा विवाह सोहळा पार पडणार आहे. विजय आणि रश्मिका यांनी आपले लग्न अत्यंत खासगी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या विवाह सोहळ्याला केवळ जवळचे नातेवाईक आणि मोजकेच मित्र उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चांप्रमाणेच लग्नाबाबतही कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.

'रील' ते 'रिअल' लाईफ पार्टनर
विजय आणि रश्मिका यांनी 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पडद्यावरची त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना इतकी आवडली की खऱ्या आयुष्यातही त्यांनी लग्न करावे, अशी चाहत्यांची इच्छा होती. या जोडप्याने अधिकृतपणे त्यांच्या नात्याची कबुली दिली नसली तरी, 'द गर्लफ्रेंड' या चित्रपटाच्या एका कार्यक्रमात विजय हा रश्मिकाच्या हाताचे अगदी प्रेमानं कीस घेताना दिसला होता.
विजय आणि रश्मिकाच्या वयात सात वर्षांचा फरक आहे. विजय रश्मिकापेक्षा सात वर्षांनी मोठा आहे. रश्मिका सध्या २९ वर्षांची आहे, तर विजय ३६ वर्षांचा आहे.अलीकडेच, एका मुलाखतीदरम्यान रश्मिकाला लग्नाबद्दल विचारले असता, तिने ते स्वीकारले नाही आणि नाकारलेही नाही. अभिनेत्री म्हणाली की, "योग्य वेळ आल्यावर सर्वांना कळेल".