लग्नाच्या धामधुमीनंतर विजय-रश्मिका काय करणार? रिसेप्शनमध्ये विजय देवरकोंडा खुलासा करत म्हणाला, "आम्हाला फक्त आता..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 10:49 IST2026-03-05T10:48:11+5:302026-03-05T10:49:33+5:30
हैदराबादमध्ये झालं 'विरोश'चं शाही रिसेप्शन! धोतर-कुर्त्यात पोहोचला विजय, तर साडीतल्या रश्मिकाने जिंकलं हृदय

लग्नाच्या धामधुमीनंतर विजय-रश्मिका काय करणार? रिसेप्शनमध्ये विजय देवरकोंडा खुलासा करत म्हणाला, "आम्हाला फक्त आता..."
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कपल म्हणजेच विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना. उदयपूरमध्ये २६ फेब्रुवारीला गुपचूप लग्नगाठ बांधल्यानंतर, या जोडीने बुधवारी रात्री हैदराबादच्या 'ताज कृष्णा' हॉटेलमध्ये एका भव्य रिसेप्शनचे (Wedding Reception) आयोजन केले होते. या सोहळ्यात संपूर्ण दक्षिण आणि बॉलिवूड सिनेसृष्टी अवतरली होती. यावेळी विजय देवरकोंडाने त्याच्या रिसेप्शनमध्ये एका मजेशीर पण प्रामाणिक उत्तरातून सर्वांचे लक्ष वेधले. रिसेप्शन संपल्यानंतर तो आणि रश्मिका सर्वात पहिले काय करणार, याचा खुलासा त्यानं केला.
रिसेप्शनच्या गडबडीत जेव्हा पापाराझींनी विजय आणि रश्मिकाला त्यांच्या पुढच्या प्लॅनबद्दल विचारले, तेव्हा विजयने आपल्या खास विनोदी शैलीत उत्तर दिले. हसत हसत विजय म्हणाला, "आम्हाला फक्त आता हे सर्व उत्सव संपण्याची प्रतीक्षा आहे. त्यानंतर, आम्ही दोघेही 'भूमिगत' (Underground) होणार आहोत आणि फक्त शांत बसणार आहोत. धन्यवाद!". विजयाने केलेल्या या विधानाचा अर्थ असा की, गेल्या अनेक आठवड्यांपासून लग्नाच्या धावपळीत हे जोडपे थकले आहे. आता त्यांना लोकांच्या नजरेपासून दूर राहून आपल्या वैयक्तिक आयुष्याचा शांतपणे आनंद घ्यायचा आहे.
रिसेप्शनमध्ये दिसला 'साधेपणा'
एवढं मोठं सेलिब्रिटी कपल असूनही विजय आणि रश्मिकाने रिसेप्शनसाठी अत्यंत साध्या आणि पारंपरिक लूकची निवड केली होती. विजय देवरकोंडाने पांढऱ्या रंगाची पारंपारिक वेष्टी आणि कुर्ता परिधान केला होता. तर रश्मिकाने देखील साध्या पण देखण्या साडीत सर्वांची मने जिंकली. या दोघांची रिसेप्शनमधील केमिस्ट्री पाहून चाहत्यांना त्यांच्या 'गीता गोविंदम' या सुपरहिट चित्रपटाची आठवण झाली.
दिग्गजांची मांदियाळी
या शाही रिसेप्शनला अल्लू अर्जुन, राम चरण तेजा यांच्यासह बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक बड्या स्टार्सनी हजेरी लावली होती. लग्नाच्या सहा दिवसांनंतर झालेल्या या सोहळ्याची चर्चा सध्या संपूर्ण देशभरात होत आहे. आता हे जोडपे काही काळ विश्रांती घेऊन आपल्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.