"सिनेमा ब्लॉकबस्टर होणार...", रश्मिका मंदानाचा 'मायसा'चा टीझर चाहत्यांना आवडला, अभिनेत्रीला दिली पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 09:30 IST2025-12-25T09:30:04+5:302025-12-25T09:30:04+5:30
'मायसा' सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये रश्मिकाचा कधीही न पाहिलेला लूक दिसत आहे.

"सिनेमा ब्लॉकबस्टर होणार...", रश्मिका मंदानाचा 'मायसा'चा टीझर चाहत्यांना आवडला, अभिनेत्रीला दिली पसंती
साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना पुन्हा एकदा तिच्या नव्या सिनेमातून धमाका करणार आहे. पुष्पा, अॅनिमल सारख्या हिट सिनेमांनंतर रश्मिकाच्या 'मायसा'(Mysaa) या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमातील रश्मिकाची पहिली झलक समोर आली आहे. 'मायसा' सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये रश्मिकाचा कधीही न पाहिलेला लूक दिसत आहे.
'मायसा'च्या टीझरमध्ये दिसतंय की जंगलात एक मुलगी दिसत आहे. तिला मारण्यासाठी जमाव तिच्या दिशेने येत असल्याचं दिसत आहे. त्या जमावाला सामोरं जाण्यासाठी ती मुलगीही तयार आहे. ही मुलगी म्हणजेच रश्मिका आहे. रश्मिका जखमी अवस्थेत दिसत आहे. तिच्या हातात बंदूक आहे. चेहऱ्यावर जखमा आणि पायही रक्ताने माखलेले दिसत आहेत. जमावातून एक आगीची बॉटल तिच्याकडे फेकली जाते. पण, ती न घाबरता बंदूक रोखून त्याला उत्तर देत असल्याचं दिसत आहे. जणू एका घायाळ वाघिणीसारखी रश्मिका भासत आहे. रश्मिकाच्या 'मायसा' सिनेमाचा हा टीझर पाहून अंगावर काटा उभा राहत आहे.
'मायसा'चा टीझर शेअर करत रश्मिकाने "ही फक्त एक सुरुवात आहे", असं कॅप्शन तिने दिलं आहे. रश्मिकाच्या सिनेमाचा टीझर पाहून चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता वाढली आहे. या टीझरवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. "सिनेमा ब्लॉकबस्टर होणार", "लेडी सुपरस्टार रश्मिका", "हिच्या अभिनयाच्या मी प्रेमात आहे", "अंगावर काटा आला", "इंटरनॅशनल क्रश" अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
'मायसा' हा सिनेमा एक अॅक्शन थ्रीलर असणार आहे. ज्यामध्ये रश्मिका अॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे. येत्या नवीन वर्षात म्हणजेच २०२६ मध्ये रश्मिकाचा हा नवा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार असल्याचं बोललं जात आहे.