अभिनेत्याच्या दारूच्या ब्रँडची जगभरात चर्चा; संस्कृत-स्पॅनिश नावाच्या टकिलाची किंमत किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 13:38 IST2025-11-20T13:35:54+5:302025-11-20T13:38:36+5:30
या खास टकीलाच्या एका बाटलीची किंमत किती आहे, हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

अभिनेत्याच्या दारूच्या ब्रँडची जगभरात चर्चा; संस्कृत-स्पॅनिश नावाच्या टकिलाची किंमत किती?
'बाहुबली'मधील 'भल्लालदेव'च्या भूमिकेतून जगभरात ओळख निर्माण करणारा लोकप्रिय अभिनेता राणा दग्गुबाती (Rana Daggubati) आता एका नवीन आणि वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. अभिनय आणि निर्मितीच्या पलीकडे जात राणाने आता बिझनेसच्या जगात एक मोठी उडी घेतली आहे. ती म्हणजे त्याचा स्वतःचा 'टकीला' ब्रँड सुरू करून. वर्षभरापूर्वीच प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांच्यासोबत पार्टनरशिप करून त्याने या ब्रँडची सुरुवात केली. या टकीला ब्रँडचं नाव संस्कृत आणि स्पॅनिश शब्दांचं खास मिश्रण आहे. ज्यामुळे त्याची जगभरात चर्चा होत आहे. मात्र, हा लोकप्रिय ब्रँड भारतात विकला जात नाही, मग या खास टकीलाच्या एका बाटलीची किंमत किती आहे, हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
राणा दग्गुबती हा संगीतकार अनिरुद्ध रविचंदरबरोबर या ब्रँडचा सह-संस्थापक आहेत. या ब्रँडचे तिसरे सह-संस्थापक हर्षा वडलामुडी देखील आहेत. २०२४ मध्ये अमेरिकेत या ब्रँडचं अधिकृत लॉन्चिंग झालं होतं. त्यानंतर सिंगापूरमध्ये दोन दिवसांचा भव्य कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. या ब्रँडचं नाव 'लोका लोका' (Loca Loka) असं आहे. 'लोका' या शब्दाचा म्हणजे स्पॅनिशमध्ये 'वेडा' असा अर्थ होता. तर संस्कृतमध्ये 'जग' असा अर्थ आहे. त्यामुळे ब्रँडच्या नावाचा अर्थ थेट "वेडं जग" (Crazy World) असा निघतो, जो खूपच आकर्षक आणि वेगळा आहे.
एका टकीलाची किंमत किती?
राणा दग्गुबातीचा हा 'लोका लोका' ब्रँड अद्याप भारतात पूर्णपणे लाँच झाला नसला तरी, त्याची चर्चा जोरदार आहे. या ब्रँडच्या ७५० मिली टकीलाची किंमत भारतीय ड्युटी-फ्री दुकानांमध्ये अंदाजे ५ हजार ते ७ हजार आहे.
राणा दग्गुबतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच त्यांचा 'कांथा' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात राणासोबतचं मुख्य भुमिकांमध्ये दुलकर सलमान, समुथिरकानी आणि भाग्यश्री बोरसे आहेत. दुलकर सलमानची 'वेल्फेअर फिल्म्स' आणि राणा दग्गुबातीची 'स्पिरिट मीडिया' यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.