प्रतीक्षा संपली! राम चरण आणि जान्हवी कपूरच्या 'पेड्डी' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 10:59 IST2026-02-05T10:56:47+5:302026-02-05T10:59:38+5:30
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर केली आहे.

प्रतीक्षा संपली! राम चरण आणि जान्हवी कपूरच्या 'पेड्डी' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
'आरआरआर' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटातून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणारा सुपरस्टार राम चरण सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. 'गेम चेंजर'नंतर राम चरण आता 'पेड्डी' या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर केली आहे.
राम चरणने बुधवारी आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून 'पेड्डी' चित्रपटाचे एक नवीन आणि अतिशय 'इंटेन्स' पोस्टर शेअर केले आहे. यासोबतच त्याने प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली. राम चरणचा हा अॅक्शन पॅक्ड चित्रपट ३० एप्रिल २०२६ रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर तुफान व्हायरल होत आहे.
'पेड्डी' चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे राम चरण आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर यांची जोडी. जान्हवीने यापूर्वी ज्युनियर एनटीआरसोबत 'देवरा' चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. मात्र राम चरणसोबत ती पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या नव्या जोडीची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत.
'पेड्डी' हा एक तेलुगू भाषेतील स्पोर्ट्स अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन बुची बाबू सना यांनी केले आहे. या चित्रपटात राम चरण एका वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे.