'कांतारा चाप्टर १' तोडणार विकी कौशलच्या 'छावा'चा रेकॉर्ड? १५ दिवसात कमावले तब्बल 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 16:19 IST2025-10-17T16:18:14+5:302025-10-17T16:19:06+5:30
२०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा छावाकडे बघितलं जातं. पण आता 'कांतारा चाप्टर १' सिनेमा 'छावा'चा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.

'कांतारा चाप्टर १' तोडणार विकी कौशलच्या 'छावा'चा रेकॉर्ड? १५ दिवसात कमावले तब्बल 'इतके' कोटी
अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या (Rishab Shetty) 'कांतारा चॅप्टर १' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे उलटले असले तरी चित्रपटाचा बोलबाला कायम आहे. आता सर्वांचं लक्ष याकडे लागलं आहे की, 'कांतारा १' हा चित्रपट विकी कौशलच्या (Vicky Kaushal) 'छावा' (Chhawa) या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडतो की नाही. कारण 'कांतारा चाप्टर १'ची कमाई अजून वाढतेच आहे.
'कांतारा चाप्टर १'चं १५ दिवसांचं कलेक्शन
'कांतारा चॅप्टर १' ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटाने केवळ १५ दिवसांत भारतात ४८५.४० कोटी इतकी प्रचंड कमाई केली आहे. कमाईचा हा वेग खूप चांगला असला तरी, १५ व्या दिवशी चित्रपटाने केवळ ९ कोटी कमावले. हा आकडा चित्रपटाच्या कमाईतील घसरण दर्शवतो. तर, चित्रपटाच्या जागतिक कमाईने १५ दिवसांत ६७९ कोटीचा टप्पा गाठला आहे. कमाईचा हा वेग पाहता, हा चित्रपट इतक्यात थिएटरमधून खाली उतरणार नाही, ज्यामुळे निर्मात्यांच्या कमाईबद्दलच्या आशा अजूनही उंचावत आहेत.
'छावा'च्या रेकॉर्डला गाठण्यासाठी मोठी कसरत
२०२५ या वर्षात विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. 'छावा'ने जगभरात ८०७.९१ कोटी कमावले होते, ज्यात भारतातील ७१६.९१ कोटींचा समावेश आहे. 'कांतारा चॅप्टर १' जोरदार कमाई करत असला तरी, 'छावा'च्या जागतिक कमाईच्या तुलनेत 'कांतारा १' अजूनही १२८ कोटींनी मागे आहे. 'कांतारा चॅप्टर १'चे निर्माते आता १,००० कोटी कमाईचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवत आहेत. त्यामुळे, ऋषभ शेट्टीला 'छावा'चा विक्रम मोडून हजार कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी पुढील काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर अधिक दमदार कामगिरी करावी लागणार आहे.