अल्लू अर्जूनचा धाकटा भाऊ बोहल्यावर चढणार, तारीख आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 15:27 IST2025-12-29T15:26:10+5:302025-12-29T15:27:11+5:30
अल्लू अर्जुनचा धाकटा भाऊ आणि अभिनेता अल्लू शिरीष लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

अल्लू अर्जूनचा धाकटा भाऊ बोहल्यावर चढणार, तारीख आली समोर
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित कुटुंबांपैकी एक असलेल्या 'अल्लू' कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. 'पुष्पा' स्टार अल्लू अर्जुनचा धाकटा भाऊ आणि अभिनेता अल्लू शिरीष लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नाची तारीख आणि वेळ आता समोर आली आहे.
अल्लू शिरीषनं इन्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याद्वारे त्यानं चाहत्यांना लग्नाच्या तारखेबद्दल माहिती दिली. अल्लू शिरीष आणि त्याची होणारी पत्नी नयनिका यांचा विवाह ६ मार्च २०२६ रोजी संपन्न होणार आहे. हे लग्न दाक्षिणात्य परंपरेनुसार पार पडणार असून, यामध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दोघांचा गेल्या ३१ ऑक्टोबर रोजी मोठ्या थाटात साखरपूडा पार पडला होता. अल्लू शिरीष आणि नयनिका हे गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत होते.
कोण आहे नयनिका?
अल्लू शिरीषची होणारी पत्नी नयनिका ही एका मोठ्या व्यावसायिक कुटुंबातील आहे. आता ती ग्लॅमरस कुटुंबाशी जोडली जाणार असली, तरी नयनिका स्वतः प्रसिद्धी आणि प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहणे पसंत करते. तिचा जन्म आणि शिक्षण हैदराबादमध्येच झाले आहे. साखरपुड्यात तिच्या साधेपणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
अल्लू शिरीषचा अभिनय प्रवास
अल्लू अर्जुनप्रमाणेच शिरीषनेही अभिनयात आपले नशीब आजमावले आहे. २०१३ मध्ये 'गौरवम्' या चित्रपटातून त्याने इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. 'कोठा जनता', 'श्रीरस्तु शुभमस्तु' आणि 'उर्वसिवो राक्षसिवो' यांसारख्या चित्रपटांतून त्याने आपली ओळख निर्माण केली. २०२४ मध्ये तो 'बडी' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता.