पत्नी स्नेहाला गर्दीतून वाचवण्यासाठी अल्लू अर्जुनची धडपड, चाहत्यांसमोर जोडले हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:21 IST2026-01-05T12:20:40+5:302026-01-05T12:21:41+5:30
कॅफेबाहेर 'पुष्पा'ची मोठी कसरत! पत्नी स्नेहा रेड्डीला चाहत्यांच्या गर्दीतून वाचवण्यासाठी अल्लू अर्जुन बनला 'ढाल'

पत्नी स्नेहाला गर्दीतून वाचवण्यासाठी अल्लू अर्जुनची धडपड, चाहत्यांसमोर जोडले हात
Allu Arjun Fans Mob Hyderabad Cafe : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन भारतातील अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहे. केवळ दक्षिणेतच नव्हे तर अल्लू अर्जुन एक 'पॅन इंडिया' सुपरस्टार म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही 'पुष्पा'ची हवा आहे. जगभरात त्याचा चाहतावर्ग असून त्याची एक झलक पाहण्यासाठी प्रत्येक चाहता आसुसलेला असतो. काहीजण तर त्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. पण, चाहत्यांची ही गर्दी कधी-कधी अभिनेत्याला अडचणीत आणते. 'पुष्पा २'च्या प्रीमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन मोठ्या संकटात सापडला होता. आता पुन्हा एकदा चाहत्यांनी केलेल्या गर्दीपुढे अभिनेत्याला अक्षरशः हात जोडावे लागलेत.
अल्लू अर्जुन आणि त्याची पत्नी स्नेहा रेड्डी यांना नुकताच हैदराबादमध्ये एका थरारक अनुभवाचा सामना करावा लागला. हाय-टेक सिटी परिसरातील एका कॅफेला भेट देणे या स्टार कपलला चांगलेच महागात पडले. चाहत्यांच्या तुफान गर्दीमुळे तिथे इतका गोंधळ उडाला की, अल्लू अर्जुनला आपल्या पत्नीला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, शेकडो चाहत्यांनी कॅफेला वेढा घातला होता आणि प्रत्येकजण आपल्या लाडक्या 'पुष्पा' स्टारची एक झलक मिळवण्यासाठी धडपडत होता. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की, अल्लू अर्जुनची खाजगी सुरक्षा टीमही गर्दी नियंत्रित करण्यात हतबल दिसत होती.
व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन आपल्या पत्नीला गर्दीपासून वाचवण्यासाठी तिचा हात घट्ट धरून चालताना दिसत आहे. कॅफे व्यवस्थापनाने मागच्या दाराने त्यांना बाहेर काढले, परंतु तिथेही चाहते सेल्फीसाठी त्यांचा पाठलाग करत होते. शेवटी हात जोडून विनंती करत अल्लू अर्जुनने आपल्या पत्नीला कारपर्यंत सुखरूप पोहोचवले.
Allu Arjun had a hard time at Niloufer Cafe.
— MKJ (@1nonly_MKJ) January 5, 2026
When @alluarjun and Sneha Reddy went to the cafe in Hitech City, fans surrounded them for selfies. The crowd was so big that the couple struggled to leave and get into their car.#AlluArjun#Hyderabad#Newspic.twitter.com/2z1PuKS9aI
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी
तेलंगणातील हैदराबाद पोलिसांनी संध्या ७० मिमी थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीचा तपास पूर्ण केला आहे. २४ डिसेंबर रोजी पोलिसांनी अल्लू अर्जुन, थिएटर मालक आणि आठ बाउन्सरसह २३ जणांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. पोलिसांनी त्यांच्या आरोपपत्रात सर्वांना दोषी ठरवले आहे. आता सुनावणीनंतर न्यायालय आपला निकाल देणार आहे. हैदराबादचे पोलिस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांनी शनिवारी सांगितले की, संध्या ७० मिमी थिएटरमध्ये पुष्पा २च्या प्रीमियर दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे आणि न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.