प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 11:47 IST2025-11-12T11:45:03+5:302025-11-12T11:47:57+5:30
नुकतंच अभिनेत्रीने एका मुलाखतीत ही माहिती देत दु:ख व्यक्त केलं.

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
दिल्लीतील लाल किल्लाजवळ १० नोव्हेंबर रोजी स्फोट झाला. या स्फोटाने अख्खा देश हादरला आहे. अनेक लोकांचा या स्फोटात मृत्यू झाला. या घटनेमागे दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे पुरावेही समोर आले आहेत. दरम्यान दिल्ली स्फोटात एका अभिनेत्रीच्या जवळच्या मैत्रिणीचाही मृत्यू झाला. नुकतंच अभिनेत्रीने एका मुलाखतीत ही माहिती देत दु:ख व्यक्त केलं.
अभिनेत्री पायल घोषने आपल्या मैत्रिणीला दिल्ली स्फोटात गमावलं. सुनीता मिश्रा असं तिच्या मैत्रिणीचं नाव होतं. मैत्रीण नाही तर ती कुटुंबासारखीच होती. दोघींनी मिळून 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत पायल घोष म्हणाली, "सुनीता आम्हाला कायमची सोडून गेली आहे यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. एक आठवड्यापूर्वीच माझं तिच्याशी बोलणं झालं होतं. ती जिंदादिल होती, नेहमी हसत राहायची आणि सगळीकडे सकारात्मकता पसरवायची. माणूस म्हणूनही ती खूप चांगली होती पण तिचा अंत इतका क्रूर पद्धतीने झाला. ती माझ्यासाठी मैत्रिणीच्या पलीकडे कुटुंबाप्रमाणे होती. आम्ही एकत्रच लहानाचे मोठे झालो. एकत्र स्वप्न पाहिली. मस्ती केली आणि प्रत्येक संघर्षाचा सामना केला. तिला अशाप्रकारे गमावणं...मी हे दु:ख शब्दात व्यक्त करु शकत नाही."
लाल किल्लाजवळील स्फोटात मृत पावलेल्या लोकांप्रती आणि त्यांच्या कुटुंबाप्रती पायल घोषने सहवेदना व्यक्त केल्या आहेत. दुसरीकडे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. १० नोव्हेंबर सोमवारी संध्याकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी फोर्ट मेट्रो स्टेशन गेट नंबर १ जवळ एका कारमध्ये स्फोट झाला. ही घटना लाल किल्लाच्या अगदी काही मीटर अंतरावर घडली. या स्फोटात ८ लोकांचा मृत्यू झाला.