सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर अभिनेत्रीनं भटक्या कुत्र्यांशी केली पुरुषांची तुलना, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 14:01 IST2026-01-09T13:52:32+5:302026-01-09T14:01:12+5:30
कुत्र्यांच्या वर्तणुकीची तुलना पुरुषांच्या गुन्हेगारी मानसिकतेशी करत अभिनेत्रीनं वादग्रस्त विधान केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर अभिनेत्रीनं भटक्या कुत्र्यांशी केली पुरुषांची तुलना, म्हणाली...
Actor Spandana In Row : भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नांची वारंवार चर्चा होत असते. भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला कंटाळलेले नागरीक आणि श्वान प्रेमींमध्ये वाद झडत असतात. अशातच प्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी खासदार रम्या (दिव्या स्पंदना)हिने सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या एका टिप्पणीवर तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला आहे. कुत्र्यांच्या वर्तणुकीची तुलना पुरुषांच्या गुन्हेगारी मानसिकतेशी करत तिने वादग्रस्त विधान केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या भटक्या कुत्र्यांबद्दलच्या सुनावणीनंतर, अभिनेत्रीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. "पुरुषांचं मनही आपण वाचू शकत नाही, कोण बलात्कार किंवा खूनासारखा गुन्हा कोण करेल माहीत नाही. मग सर्व पुरुषांना तुरुंगात टाकायला पाहिजे का?" असा सवाल तिने विचारला. तिच्या वक्तव्यामुळे पुरुषांचा अपमान झाला आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. यामुळे तिच्यावर टीकाही होत आहे.

सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?
भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन.व्ही. अंजारिया या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. यावेळी न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एक टिप्पणी केली. ते म्हणाले, "हा मुद्दा फक्त चावण्यापुरता मर्यादित नसून भीतीचाही आहे. सकाळी कोणता कुत्रा कोणत्या मूडमध्ये आहे, हे तुम्ही कसे ओळखणार? ते ओळखणे अशक्य आहे".
"रस्त्यांवर, शाळांमध्ये, रुग्णालयांमध्ये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी श्वान असणं धोकादायक आहे. कारण ते चावू शकतात तसेच ते अपघात देखील घडवू शकतात", अशी टिप्पणी न्यायाधीशांनी केली. शाळा, रुग्णालये, रेल्वे स्थानकं या सार्वजनिक जागा कुत्र्यांपासून मुक्त करण्याची गरज आहे, यावर न्यायालयाने भर दिला.
दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये न्यायालयाने शाळा, रुग्णालये आणि सार्वजनिक ठिकाणांहून कुत्र्यांना हटवून त्यांचे लसीकरण व नसबंदी करून त्यांना आश्रयस्थानात हलवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या विरोधात अनेक प्राणिप्रेमींनी आवाज उठवला. नुकतेच दिल्लीतील जंतरमंतर येथे मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली, ज्यात संगीतकार मोहित चौहान आणि राहुल राम यांनीही सहभाग घेतला होता.