१७ अभिनेते अन् २१ निर्मात्यांनी रिजेक्ट केलं, पण प्रदर्शित होताच ठरला ब्लॉकबस्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:46 IST2026-01-07T17:42:30+5:302026-01-07T17:46:21+5:30
जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा २ तास ५० मिनिटांच्या या क्राईम थ्रिलरने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले आणि तो एक 'कल्ट क्लासिक' ठरला.

१७ अभिनेते अन् २१ निर्मात्यांनी रिजेक्ट केलं, पण प्रदर्शित होताच ठरला ब्लॉकबस्टर
सिनेमांची ऑफर सुरुवातीला एकाला मिळते आणि शेवटी त्यांच्यामध्ये काम दुसराच करतो. असं बऱ्याच सिनेमांच्या बाबतीत घडलं आहे. असाच एक सिनेमा आहे ज्याची ऑफर १७ कलाकारांनी नाकारली होती. इतकेच नाही, तर २१ निर्मात्यांनीही या चित्रपटात पैसे गुंतवण्यास नकार दिला होता. २१ निर्मात्यांनी पाठ फिरवल्यानंतर अखेर जी. दिल्ली बाबू आणि आर. श्रीधर हे पुढे आले आणि त्यांनी या चित्रपटात पैसे गुंतवले. या दोघांनी चित्रपटाच्या कथेवर आणि दिग्दर्शक राम कुमार यांच्या व्हिजनवर विश्वास दाखवला, जो पुढे जाऊन सार्थ ठरला. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा त्याने बॉक्स ऑफिसचे सर्व विक्रम मोडले होते.
महिलांवरील गुन्ह्यांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची कथा इतकी थरारक आहे की ती प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवले. हा चित्रपट म्हणजे २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपट 'रत्सासन'. दिग्दर्शक राम कुमार यांच्या या चित्रपटात विष्णू विशाल मुख्य भूमिकेत आहे. अमला पॉल, राधा रवी आणि मुनिष्कांत यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका होत्या.
भेटवस्तू देऊन महिलांचे अपहरण करणारा आणि त्यांची हत्या करणारा एक क्रूर खलनायक आणि त्याला शोधणारा पोलीस अधिकारी, अशी या चित्रपटाची थरारक कथा आहे. उत्तम पटकथा आणि अंगावर शहारे आणणारे पार्श्वसंगीत यामुळे हा चित्रपट लोकप्रिय झाला. २ तास ५० मिनिटांच्या या चित्रपटातील 'क्लायमॅक्स ट्विस्ट'ने तर प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं. 'रत्सासन' हा चित्रपट सध्या जिओ हॉटस्टारवर उपलब्ध आहे. मूळ तमिळ भाषेसोबतच हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू भाषांमध्येही पाहता येतो.
