"तुम्ही नंबर पाठवा, आम्ही..", लातूरच्या शेतकऱ्यासाठी सोनू सूद ठरला आधार, करणार 'ही' मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 11:44 IST2025-07-03T11:40:07+5:302025-07-03T11:44:20+5:30
सोनू सूदने लातूरमधील शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात पुढे दिला आहे. त्यामुळे सर्वांनी अभिनेत्याचं कौतुक केलं.

"तुम्ही नंबर पाठवा, आम्ही..", लातूरच्या शेतकऱ्यासाठी सोनू सूद ठरला आधार, करणार 'ही' मदत
एका शेतकरी दाम्पत्याच्या व्हिडीओमुळे महाराष्ट्रात मोठीच खळबळ उडाली. लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील हडोळती शिवारात पंचाहत्तरी गाठलेले अंबादास पवार यांनी स्वतःला कोळपणीच्या कामाला जुंपून घेतले आहे. त्यांच्या सोबत पत्नी मुक्ताबाई होत्या. बैलजोडी घ्यायला परवडत नसल्याने या शेतकरी दाम्पत्याने स्वतःच जमीन नांगरायला सुरुवात केली. हा व्हिडीओ देशभरात वेगाने व्हायरल झाला. या व्हिडीओवर सोनू सूदने प्रतिक्रिया दिली असून त्याने या शेतकरी दाम्पत्यासाठी बैल पाठवायचं आश्वासन दिलंय.
सोनू सूदने पुढे केला मदतीचा हात
लातूरमधील या शेतकरी दाम्पत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ ANI आणि अन्य न्यूज चॅनलने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ पाहताच सोनू सूद म्हणाला, "तुम्ही नंबर पाठवा, आम्ही बैल पाठवतो". सोनूची ही पोस्ट वेगाने व्हायरल झाली. सोनूने लातूरच्या या वृद्ध शेतकरी दाम्पत्यासाठी मदतीचा हात पुढे केल्याने सर्वांनी त्याचं कौतुक केलंय. यावर एका नेटकऱ्याने कमेंट केलीय की, "ट्रॅक्टरच पाठवा ना, या वयात बैल कोण हाकणार?" यावर रिप्लाय करत सोनू म्हणाला, "या शेतकरी बांधवाला ट्रॅक्टर चालवता येत नाही, त्यामुळे बैल पाठवणं उत्तम आहे मित्रा".
#WATCH | Maharashtra | An elderly farmer tills dry land by tying himself to traditional plough in drought-hit area in Latur pic.twitter.com/9geMReVGB0
— ANI (@ANI) July 2, 2025
लातूरमधील शेतकरी दाम्पत्याची चर्चा
शेती नांगरण्यासाठी अंबादास यांना बैल घ्यायचा होता. पण त्याचा दर दिवसाला अडीच हजार रुपयांचा सांगण्यात आला. एवढी रक्कम नसल्याने नाईलाजास्तव अंबादास आणि मुक्ताबाई या पती- पत्नीने स्वत:च कोळपणीचा जू खांद्यावर घेतला. वयोवृध्द पतीचे श्रम पाहून पाणावलेल्या डोळ्यांनी पत्नी मुक्ताबाई पवार यांनी त्यांना शेतीकामास मदत करण्याचं ठरवलं. कोळपणी करताना ७५ वर्षीय अंबादास यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. परंतु, आर्थिक अडचणींमुळे त्यांना खांद्यावर जू घ्यावा लागला. सरकार दरबारी या दाम्पत्याची दखल घेण्यात आली आहे. शिवाय सोनू सूदने सुद्धा मदतीचा हात पुढे केल्याने या दाम्पत्याला मोठा आधार मिळेल.