Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:32 IST2025-07-08T16:32:12+5:302025-07-08T16:32:56+5:30
Sonu Sood : सोनू सूदनं शेतकऱ्याला पाठवलेल्या आर्थिक मदतीचा पुरावा देताना स्वतःचं बँक स्टेटमेंट शेअर करत त्या व्यवहाराचा तपशील जाहीर केला आहे.

Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
Sonu Sood Bank Statement Help Latur Farmer: लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हडोळती शिवारात पंचाहत्तरी गाठलेले अंबादास पवार (Old Latur Farmer) यांनी स्वत:च औताला जुंपलं होतं. बैलजोडी घ्यायला परवडत नसल्याने शेतात कोळपणी करण्यासाठी स्वत:च नांगर ओढायला सुरुवात केली. त्यांच्या सोबत पत्नी मुक्ताबाई होत्या. या शेतकऱ्याचा व्हिडीओ (Latur Farmer Video) व्हायरल झाला आणि अनेकजण पुढे आले. यात 'रिअल लाईफ हिरो' म्हणून ओळखला जाणारा सोनू सूद होता. सोनू सूदनंशेतकरी दाम्पत्यासाठी बैल पाठवायचं आश्वासन दिलं. पण, यावरुन काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली. 'बैल पाठवतो म्हटला होतास, मग मदत केली का?' असा टोमणा एका युजरने मारला. यावर मात्र सोनू सूदनं थेट स्वतःचं बँक स्टेटमेंटच शेअर करून त्या नेटकऱ्याला सडेतोर प्रतिउत्तर दिलं.
गुरुप्रीत वालीया नावाच्या एका सोशल मीडिया वापरकर्त्याने एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर पोस्ट करत म्हटलं, "तुम्हाला या शेतकऱ्याचा फोटो आठवतो का? सोनू सूदनं त्यांना बैल पाठवण्याचं आश्वासन दिलं होतं. मी अनेकदा पाहिलंय की सोनू सूदची टीम ५% मदत करते आणि ९५% पीआर करते. खऱ्या अर्थानं ज्यांनी मदत केली, ते होते राज्याचे मंत्री बाबासाहेब पाटील, त्यांनी शेतकऱ्याचं ४२,५०० रुपयांचं थकित कर्ज फेडलं. मग सोनू सूदनं नक्की काय केलं? जो माणूस आजही हाताने शेती करतो, त्याच्याकडे ट्विटर असणार तरी कुठे? बरं, जर सोनू भाऊंनी खरंच काही मदत केली असेल, तर जरूर सांगा... त्याबद्दलही मी लिहीन".
यावर सोनू सुदनं प्रत्युत्तर दिलं आहे. सोनू सूदनं शेतकऱ्याला पाठवलेल्या आर्थिक मदतीचा पुरावा देताना स्वतःचं बँक स्टेटमेंट शेअर करत त्या व्यवहाराचा तपशील जाहीर केला आहे. पण, त्यानं नेमकं किती पैसे टाकले हे उघड केलं नाही. बँक स्टेटमेंट शेअर करताना सोनू सूदने लिहिलं की, "माझ्या वाट्याची मदत तर मी आधीच आपल्या शेतकरी अंबादास यांना केली आहे. आता तुम्ही तुमच्या वाट्याची मदतही पाठवा ना... कारण, काय आहे ना भाऊ, ट्विटरवर विष पसरवून देश चालत नाही. कोणाला मदत पोहोचवायची असेल तर मेसेज करा..जय हिंद!", असं त्यानं म्हटलं.
मेरे हिस्से की मदद तो मैंने पहले ही हमारे किसान अंबादास भाई की कर दी थी।
— sonu sood (@SonuSood) July 7, 2025
अब अपने हिस्से की घास आप भी भेज देना 🙏
क्या है ना भाई, ट्विटर पे ज़हर फैलाने से देश नहीं चलेगा। किसी और को मदद पहुँचाना हो तो मेसेज कर देना 🙏
जय हिन्द 🇮🇳 https://t.co/E3jsMP0w3Xpic.twitter.com/WxMd0IxjjW