दुसऱ्या प्रेग्नंसीच्या चर्चांदरम्यान दिसली सोनम कपूरची झलक, बहिणीच्या साखरपुड्याला लावली हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 15:27 IST2025-10-03T15:27:24+5:302025-10-03T15:27:47+5:30
वयाच्या ४० व्या वर्षी ती पुन्हा आई होणार आहे.

दुसऱ्या प्रेग्नंसीच्या चर्चांदरम्यान दिसली सोनम कपूरची झलक, बहिणीच्या साखरपुड्याला लावली हजेरी
अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची बातमी नुकतीच आली होती. सोनमने २०२२ मध्ये मुलाला जन्म दिला होता. त्याचं नाव वायू असं आहे. आता तीन वर्षांनी ती पुन्हा गरोदर असल्याची चर्चा आहे. वयाच्या ४० व्या वर्षी ती पुन्हा आई होणार आहे. या चर्चांदरम्यान सोनम पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली. बहीण अंशुला कपूरच्या साखरपुड्यासाठी आली असता पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कैद केलं.
'पिंकव्हिला' ने दिलेल्या रिपोर्टनुसार सोनम कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे. सध्या ती दुसऱ्या ट्रायमिस्टरमध्ये आहे. लवकरच सोनम आणि पती आनंद आहुजा चाहत्यांसोबत ही गुडन्यूज शेअर करणात आहेत. दरम्यान अर्जुन कपूरची सख्खी बहीण आणि सोनमची चुलत बहीण अंशुला कपूरचा आज साखरपुडा आहे. यासाठी सोनमही अंशुलाच्या फंक्शनसाठी पोहोचली. प्रेग्नंसीच्या चर्चांदरम्यान तिची पहिल्यांदाच झलक दिसली. फॅशनसाठी प्रसिद्ध असलेल्या सोनमने स्टायलिश ब्राऊन इंडो वेस्टर्न लूक केला होता. लाँग स्कर्ट, टॉप आणि ब्लेझर असा तिचा आऊटफिट होता. यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.
दरवेळी पापाराझींसमोर पोज देणाऱ्या सोनमने यावेळी मात्र कॅमेऱ्यासमोर येणं टाळलं. तिच्या टीमने पापाराझींना सोनमला जाऊ देण्याची विनंती केली. कारमधून उतरुन घरात जाताना सोनमची झलक दिसली.
सोनम कपूरने २०१८ साली बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केलं. दोघंही कधी दिल्ली तर कधी लंडनला राहतात. २०२२ साली सोनमने मुलाला जन्म दिला. आता तो तीन वर्षांचा आहे आणि लवकरच त्याच्यासाठी एक छोटा भाऊ किंवा बहीण येणार आहे. तर अनिल कपूर पुन्हा आजोबा होणार आहेत.