सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 12:41 IST2025-10-08T12:40:28+5:302025-10-08T12:41:13+5:30
अमृता सिंह आणि सैफ अली खानचा २००४ साली घटस्फोट झाला. तेव्हा कुटुंबासाठीही तो कठीण काळ होता असं सोहा म्हणाली.

सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
अभिनेता सैफ अली खानने १९९१ साली अभिनेत्री अमृता सिंहसोबत लग्न केलं होतं. तेव्हा सैफ अमृताहून १२ वर्षांनी लहान होता. वयाच्या २१ व्या वर्षीच त्याने अमृताशी लग्नगाठ बांधली होती. तो तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. दोघांना सारा आणि इब्राहिम ही मुलंही झाली. मात्र नंतर दोघांमध्ये बिनसलं आणि २००४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सैफची बहीण सोहा अली खानने नुकतंच तिचं वहिनी अमृतासोबत तेव्हा कसं नातं होतं याचा खुलासा केला.
एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सोहा अली खान म्हणाली, "काही गोष्टी आपल्या हातात नसतात. जेव्हा लग्न मोडतं तेव्हा कुटुंबांमध्येही बदल होता. मग काळानुसार आपण आपापली ओळख बनवतो. पण हे जरा कठीण नक्कीच असतं."
अमृता सिंहसोबतच्या नात्याबद्दल सोहा म्हणाली, "अमृता माझ्यासाठी अशी वहिनी होती जिच्यासोबत मी तिच्या घरी राहिले आहे. तिने माझी खूप काळजी घेतली. ती मला फोटोशूट्ससाठीही घेऊन जायची. आम्ही एकत्र स्क्रेबलही खेळायचो. अशा प्रकारच्या नात्यात ताळमेळ साधायला वेळ लागतो. जेव्हा सैफ आणि तिचा घटस्फोट झाला तेव्हा आम्ही कुटुंबीय सुद्धा कठीण काळातून जात होतो. तेव्हा सारा ९ वर्षांची होती तर इब्राहिम ३ वर्षांचा होता. पण आता वाटतं की सगळं ठीक आहे. मुलंही मोठी झाली आहेत. तुम्ही जसे आहात तसेच राहू शकता."
अमृता आणि सैफच्या लग्नाची आणि नंतर घटस्फोटाचीही बीटाऊनमध्ये खूप चर्चा झाली होती. घटस्फोटानंतर अमृताने पुन्हा लग्न केलं नाही. तसंच ती सैफ आणि त्याच्या कुटुंबासोबतही पुन्हा कधीच दिसली नाही. तिने दोन्ही मुलांचा सांभाळ केला. तसंच मुलांना सैफपासून कधीच दूरही ठेवलं नाही. आज तिची मुलं सैफची दुसरी पत्नी करीना कपूरसोबतही चांगली मिसळली आहेत. काही महिन्यांपूर्वी सैफवर त्याच्या घरातच हल्ला झाला होता. आश्चर्य म्हणजे तेव्हाही अमृता त्याला भेटायला रुग्णालयात आली नाही.