शूरा मी वंदिले
By Admin | Updated: September 30, 2016 03:39 IST2016-09-30T03:39:27+5:302016-09-30T03:39:27+5:30
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करत भारतीय जवानांनी मोहीम फत्ते केलीय.

शूरा मी वंदिले
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करत भारतीय जवानांनी मोहीम फत्ते केलीय. शिवाय ३०-३५ दहशतवाद्यांचा खात्माही करण्यात आलाय. भारतीय शूर जवानांच्या या कामगिरीचं सर्वच स्तरांतून कौतुक होतंय. टिष्ट्वटर आणि सोशल मीडियावर जवानांना सॅल्यूट करण्यात येतंय. मराठी सेलीब्रिटींनी भारतीय जवानांच्या या जाबाज कामगिरीचं कौतुक आणि अभिमान व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया सीएनएक्स लोकमतला दिल्या आहेत.
हेमंत ढोमे
भारतीय लष्कराची भूमिका यावेळी शंभर टक्के योग्यच आहे. कुठेतरी कणखर भूमिका घेणे गरजेचेच होते. किती दिवस भारत पाकिस्तानाच शांतीचा संदेश देणारी कबूतरं पाठवणार? त्यामुळे अभिमान आहे मला की भारतीय लष्कराने पाकिस्तानला भीती वाटावी म्हणून नाही तर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हे पाऊल उचललंय. दुसरीकडे पाकिस्तानी कलाकारांसाठी भारत ही त्यांची कर्मभूमी आहे. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांनी आजपर्यंत पाकिस्तान विरोधात कधीच निषेध व्यक्त केला नाही जे त्यांनी करायला हवं होते. त्यामुळे पाकिस्तानी कलाकरांनी त्यांच्या देशात जावे हेसुद्धा योग्यच आहे. जर त्यांच्या कलाकारांनी कुठेतरी निषेध केला असता तर त्यांच्याविषयी आपल्याला निदान सहानुभूती वाटली असती मात्र त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा त्यांच्या देशात चालतं व्हावं.
मयुरी वाघ
पाकिस्तानला प्रत्युत्तर हे खूप आधीच द्यायला हवं होतं. आजवर खूप सहन केलं. मात्र कधी ना कधी सहनशीलता आणि सहनशक्ती संपते. मध्यंतरी एका पाकिस्तानी कलाकाराने त्याच्या राष्ट्राचा त्याला अभिमान असल्याचे म्हटलं होतं. अशांना भारतात एंट्रीच देऊ नये. त्यांनी त्यांच्याच देशात राहून त्यांच्या देशाला सपोर्ट करावा. खरंतर कलेला कसलीच बंधनं नसतात मात्र असे कलाकार जे भारतात राहतात आणि पाकिस्तानाचा अभिमान बाळगतात त्यांनी पाकिस्तानातच जावं. आज जगातील अनेक देश भारताच्या समर्थनार्थ उभे ठाकलेत. हा पंतप्रधान मोदींचा मोठा विजय आहे.
हेमांगी कवी
भारतीय लष्कराने पाकिस्तानला धडा शिकवणं गरजेचं होतं. जेणेकरून पाकिस्तान पुन्हा भारताकडे डोळे वटारुन बघण्याआधी हजार वेळा विचार करेल. त्यासाठी आपली ताकद त्यांना दाखवणे गरजेचे होते. भारतीय लष्कराने जो हल्ला पाकिस्तानवर चढवला ती खरच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
आदिनाथ कोठारे
भारतीय लष्कराने जे पाऊल उचलंलय ते योग्यच आहे. दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देणं गरजेच होतं.भारतात राहून, इथे काम करुन पैसा कमावणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांनी उरी हल्ल्याचा निषेध करु नये हे दुदैर्वी आणि तितकंच संतापजनक आहे. भारतीय जवानांची पाकविरोधी कारवाई आणि भारत सरकार दोघांचंही अभिनंदन. भारतीय म्हणून माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे.
स्मिता तांबे
पाकिस्तानचा मूळात हेतू काय हेच कळत नाही. त्यांच्या अंतर्गत परिस्थितीमुळं भारतानं नुकसान का सोसावं? पाकिस्ताननं दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांवर ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. किती दिवस आपण तरी गप्प बसणार? सहनशक्तीचा अंत कधीतरी होतोच. कधी तरी व्यक्त व्हावे लागते. भारतीय लष्कराने तेच केले. ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत. सुखाने झोपतोय आणि राहतोय ते फक्त आणि फक्त आपल्या शूरवीर जवानांमुळे. पाकिस्तानी कलाकारांचीही काही कारण असावीत त्यामुळे कदाचित ते पाकिस्तानचा जाहीर निषेध नोंदवत नसतील