कम्युनिटी हॉलमध्ये मराठी चित्रपट दाखवा

By Admin | Updated: February 5, 2016 02:27 IST2016-02-05T02:27:37+5:302016-02-05T02:27:37+5:30

तुम्ही डॉक्टर, इंजिनीअर किंवा कितीही मोठ्या पदावर पोहोचलात तरी तुमचे मन कोणत्या क्षेत्रात रमते हेच महत्त्वाचे असते आणि हीच आवड एखाद्या माणसाला उंचावर पोहोचवते

Show Marathi films in Community Hall | कम्युनिटी हॉलमध्ये मराठी चित्रपट दाखवा

कम्युनिटी हॉलमध्ये मराठी चित्रपट दाखवा

तुम्ही डॉक्टर, इंजिनीअर किंवा कितीही मोठ्या पदावर पोहोचलात तरी तुमचे मन कोणत्या क्षेत्रात रमते हेच महत्त्वाचे असते आणि हीच आवड एखाद्या माणसाला उंचावर पोहोचवते. अभिनेता सुनील बर्वे यांच्याबाबत हेच घडले. केमिस्ट्रीमध्ये पदवी, फार्मास्युटिकल कंपनीत स्थिर नोकरी असूनही त्यांच्यातील कलाकार स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे ते कला क्षेत्रात आले. रेडिओ जॉकी, मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी, मालिका, नाटक अशा सर्व क्षेत्रांत त्यांनी कामगिरी केली. १९८९ मध्ये ‘आत्मविश्वास’ या मराठी चित्रपटाने या दिग्गज कलाकाराचे करिअर सुरू झाले. त्यानंतर लपंडाव, अस्तित्व, लालबागचा राजा, गोजिरी, तूच खरी घराची लक्ष्मी, प्रेम म्हणजे प्रेम असतं, श्रीमंत दामोदर पंत, नटसम्राट या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. प्रतिबिंब, मेरे बाप पहिले आप या हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. कळत-नकळत, अवंतिका, बोलाची कढी, झोका, आहुती, कुंकू , श्रीयुत गंगाधर टिपरे, असंभव, तू तिथे मी अशा एक से एक मराठी मालिकेतदेखील त्यांचा अभिनय उत्कृष्ट होता. हर्बेरियम या संकल्पनेतून जुन्या गाजलेल्या पाच नाटकांचे प्रयोगही त्याने यशस्वी करून दाखविले आहेत. २५ वर्षे मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सुनील बर्वे यांनी आपले अनुभव सीएनएक्सशी शेअर केले.
मराठी चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग वाढत आहे. मात्र, ग्रामीण भागात चित्रपटगृहेच नाहीत. त्यामुळे इच्छा असूनही मराठी प्रेक्षकांना चित्रपट पाहता येत नाहीत. थिएटर्स मिळत नसतील तर कम्युनिटी हॉलमध्ये मराठी चित्रपट दाखवायला हवेत, यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न होण्याची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत याबाबत चर्चा झाली आहे. त्यांनीही याबाबत सकारात्मकपणे विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्याचा काळ हा मराठी चित्रपटांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कोर्ट, किल्ला, फॅन्ड्री, हायवे असे अनेक सामाजिक चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पुणे-मुंबई-पुणे, तू ही रे आदी मनोरंजक चित्रपटांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा फडकावीत आहेत. हे चित्रपट लोकांपर्यंत गेले पाहिजेत.
मराठी चित्रपटसृष्टी ही प्रादेशिक आहे. बॉलीवूडप्रमाणे संपूर्ण देशात प्रेक्षकवर्ग नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. चित्रपटांची संख्यादेखील वाढत आहे. आताचा प्रेक्षकवर्ग हा एका वर्गापर्यंत मर्यादित नाही. प्रेक्षकसंख्या लाखोंनी वाढली आहे. त्यांना टिकवून ठेवतानाच नवा प्रेक्षकवर्गही मिळण्याची गरज आहे. तो सध्या ग्रामीण भागात आहे. तेथे सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. मराठीमध्ये वर्षाचे ५२ आठवडे पाहता साधारणत: १०० चित्रपट येतात. त्यामुळे उपलब्ध चित्रपटगृहे कमी पडतात.

Web Title: Show Marathi films in Community Hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.