वेगळे प्रयोग करता आले पाहिजेत

By Admin | Updated: December 4, 2015 02:32 IST2015-12-04T02:32:44+5:302015-12-04T02:32:44+5:30

कोणत्याही चित्रपट, नाटक किंवा मालिकेसाठी सर्वांत महत्त्वाचे असते ते कथानक. तोच त्याचा आत्मा असतो. कारण कथानक चांगले वाटले, तरच कलाकार, दिग्दर्शक, निर्माते

Should be used separately | वेगळे प्रयोग करता आले पाहिजेत

वेगळे प्रयोग करता आले पाहिजेत

कोणत्याही चित्रपट, नाटक किंवा मालिकेसाठी सर्वांत महत्त्वाचे असते ते कथानक. तोच त्याचा आत्मा असतो. कारण कथानक चांगले वाटले, तरच कलाकार, दिग्दर्शक, निर्माते तो चित्रपट स्वीकारतात. इतकेच नाही तर आजकाल गाण्यांमुळे चित्रपट हिट होत आहेत असं म्हटलं जात असलं, तरी ते दीर्घकाळासाठी म्हणता येणार नाही, पण त्याबरोबरच... कदाचित त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं असतं ते चित्रपटाचे कथानक. त्यामुळे चित्रपटाची स्टोरी प्रेक्षकांना आवडली, तरच तो चित्रपट खऱ्या अर्थाने सुपरहिट ठरतो. सध्या एक नाव बऱ्याच जणांच्या म्हणजे केवळ निर्माते, दिग्दर्शकांच्याच नाही तर प्रेक्षकांच्याही चर्चेत आहे. ते म्हणजे क्षितिज पटवर्धन.
या लेखकाने लिहिलेल्या कथांवर एकापाठोपाठ एक सलग पाच चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट करून दाखवले आहेत. टाइमपास, क्लासमेट्स, डबल सीट, लग्न पाहावे करून आणि टाइम प्लीज हेच ते पाच चित्रपट. अर्थात, यातला टाइम प्लीज हा चित्रपट त्यानेच लिहिलेल्या ‘नवा गडी नवं राज्य’ या नाटकावर आधारित आहे. हे नाटकही प्रेक्षकांना तितकंच भावलं आणि चित्रपटानेही प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. बरं हे एकच नाटक नव्हे तर पत्रकारिता जगताच्या भोवती फिरणारे आणि नुकतेच डायमंड ज्युबिली प्रयोगांचा टप्पा पार केलेले नाटक म्हणजे, ‘दोन स्पेशल’ तर सध्या प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवत आहे. या यशस्वी नाटक आणि चित्रपटाचा लेखक क्षितिज पटवर्धनने ‘सीएनएक्स’शी आपले अनुभव शेअर केले.

ठरावीक चौकटीच्या बाहेर येताहेत प्रेक्षक
पूर्वी एकाच पद्धतीचे चित्रपट पाहायला लोकांना आवडायचं, पण गेल्या ८-१0 वर्षांत चित्रपट असो वा नाटक अनेक वेगळे विषय लोकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. त्यातून वेगळे विचार सर्वांपर्यंत पोहोचत आहेत आणि प्रेक्षकांना ते आवडतही आहेत. त्यामुळे केवळ एकाच पद्धतीच्या कथानकात अडकलेले प्रेक्षक त्या चौकटीतून बाहेर पडू लागले आहेत. जसं की, मनोरंजन करणारे चित्रपट पाहणे लोकांना आवडते तसेच फँड्री, किल्ला, कोर्ट, ख्वाडा असे वेगळा विचार देणारे चित्रपट पाहायलाही लोक प्राधान्य देत आहेत. मला असं वाटतं, हे खूप चांगलं द्योतक आहे की, आपल्याकडे इंटरेस्टिंग सेन्सिबिलिटी तयार होत आहे आणि त्यासाठी काही काळ लोटावा लागतो. ती प्रक्रिया सध्या आपल्याकडे सुरू आहे याचा जास्त आनंद आहे.

सतत नवीन
शिकायची इच्छा हवी
आपला मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे, एक विशिष्ट चौकट सोडून नाटकातही वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत आणि ते यशस्वी होत आहेत, ही खरोखरच कौतुकाची बाब आहे, पण आपलं हे यश टिकवणे आणि त्यात अजून प्रगती करण्यासाठी प्रत्येक कलाकाराने सतत नवीन काही तरी शिकायची तयारी ठेवली पाहिजे. त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे म्हणजे केवळ यशाचा विचार न करता प्रक्रियेवर लक्ष दिले पाहिजे. कारण काम उत्तम असेल तर यश नक्कीच तुमचं आहे, पण ते काम करताना तुम्हाला किती मजा आली, त्याचं सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळालं का, याचा विचार करणे जास्त गरजेचे आहे. जेव्हा त्या प्रक्रियेशी आपण प्रामाणिक राहतो, तेव्हा ती प्रत्येक वेळी आपल्याला नवीन काहीतरी शिकवत जाते.
शब्दांकन : मृण्मयी मराठे

वेगळ्या प्रयोगांचा विचार करायला हवा
राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट समजायला थोडे कठीण असतात, असा म्हणणं चुकीचं आहे. कारण आज ‘किल्ला’, ‘कोर्ट’सारखे चित्रपटही चांगला बिझनेस करत आहेत आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे असे चित्रपट आवडणारा एक वेगळा क्लास आहे. त्यांच्यासाठी असे चित्रपट कायमस्वरूपी लक्षात राहणारे ठरत आहेत, हेही तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे असे प्रयोग केलेच पाहिजेत. यामध्ये स्टोरीटेलिंगचे प्रयोग झाले पाहिजेत. त्याबरोबरच आज इतर देशात खूप वेगळेच प्रयोग केले जात आहेत. एकच समान धागा घेऊन ४-५ लघुपट बनवले जातात किंवा एका वेळेला चार वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या गोष्टी दाखवल्या जातात. अशा स्टोरीटेलिंगमध्ये खूप व्हरायटी बघायला मिळते. आपल्या मराठीची अपरिहार्यता कायम ठेवून, त्यामध्ये वेगवेगळ्या शैलीचे काय प्रयोग करता येतील, हा विचार केला गेला पाहिजे.

Web Title: Should be used separately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.