श्रद्धा कपूर साकारणार तमाशा सम्राज्ञी विठाबाईंची भूमिका, सोबत दिसणार 'हा' अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 15:43 IST2025-11-10T15:42:13+5:302025-11-10T15:43:39+5:30
श्रद्धा कपूर सध्या या सिनेमामुळे काही दिवसांपासून चर्चेत आहेच. 'छावा' फेम लक्ष्मण उतेकर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत

श्रद्धा कपूर साकारणार तमाशा सम्राज्ञी विठाबाईंची भूमिका, सोबत दिसणार 'हा' अभिनेता
'छावा' हा ब्लॉकबस्टर सिनेमा देणारे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आगामी सिनेमाची तयारी करत आहेत. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांच्या जीवनावर आधारित सिनेमा ते बनवत आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर सिनेमात विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. या प्रोजेक्टसाठी गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा लावणीचं प्रशिक्षणही घेत आहे. आता सिनेमात हिरोची एन्ट्री झाली आहे. कोण आहे सिनेमातील मुख्य अभिनेता?
'पिंकव्हिला' रिपोर्टनुसार, श्रद्धा कपूर सध्या या सिनेमामुळे काही दिवसांपासून चर्चेत आहेच. तर आता सिनेमात हिरोच्या भूमिकेसाठी रणदीप हुड्डाला कास्ट करण्यात आले आहे. या कास्टिंगबाबत मेकर्सला आत्मविश्वास आहे. रणदीप आणि श्रद्धा यांची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर बघायला मिळणार आहे. दोघंही कलाकार आपापल्या भूमिका उत्तम निभावण्यासाठी ओळखले जातात. लक्ष्मण उतेकरांचं व्हिजन पडद्यावर आणण्याची दोघांमध्ये क्षमता आहे. आता विठाबाईंचं आयुष्य पडद्यावर साकारण्यासाठी श्रद्धा आणि रणदीप सज्ज झाले आहेत.
विठाबाई नारायणगावकर यांचं लावणी आणि तमाशा या कलाप्रकारांप्रती असलेलं योगदान अतुलनीय आहे. याचीच दखल घेत त्यांना दोन वेळा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. म्हणूनच त्या मराठी कलासृष्टीतील कालातीत व्यक्ती आहेत. दरम्यान श्रद्धा कपूर पंजाबी कुटुंबात जन्माला आलेली असली तरी तिच्यावर महाराष्ट्रीय संस्कारही झाले आहेत. तिची आई मराठी कुटुंबात जन्माला आली आहे. श्रद्धा अनेकदा मराठमोळ्या लूकमध्येही दिसली आहे आणि तिने चाहत्यांना प्रेमात पाडलं आहे. आता विठाबाईंच्या भूमिकेत पाहण्यासाठी श्रद्धाचे चाहते आतुर आहेत.