‘शक्तिमान’ परततोय!

By Admin | Published: May 11, 2016 01:48 AM2016-05-11T01:48:00+5:302016-05-11T01:48:00+5:30

पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओम्कारनाथ शास्त्री.. एक सामान्य व्यक्ती.. सामान्य असूनही मन:शांती आणि ध्यानधारणा करून त्यानं सुपरपॉवर मिळवली. शत्रूचा तो कर्दनकाळ ठरला.

'Shaktiman' is returning! | ‘शक्तिमान’ परततोय!

‘शक्तिमान’ परततोय!

googlenewsNext

मुकेश खन्ना यांची ‘सीएनएक्स’ला विशेष मुलाखत
पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओम्कारनाथ शास्त्री.. एक सामान्य व्यक्ती.. सामान्य असूनही मन:शांती आणि ध्यानधारणा करून त्यानं सुपरपॉवर मिळवली. शत्रूचा तो कर्दनकाळ ठरला. ज्याचे खरे नाव शक्तिमान. छोट्या पडद्यावर १९९०च्या दशकात शक्तिमान ही मालिका आली आणि बघता बघता या मालिकेनं बच्चेकंपनीच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मुकेश खन्ना यांनी साकारलेली शक्तिमानची भूमिका आजही प्रत्येकाच्या स्मरणात आहे. शक्तिमानची पुन्हा एकदा आठवण येण्याचे कारण म्हणजे साऱ्यांचा लाडका शक्तिमान पुन्हा एकदा परत येतोय. याचनिमित्त शक्तिमान मुकेश खन्ना यांनी ‘सीएनएक्स’सोबत साधलेला हा खास संवाद
प्रश्न : शक्तिमान पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येतोय. किती एक्साईटेड आहात?
4शक्तिमान पुन्हा एकदा बच्चेकंपनीच्या भेटीला येणार आहे हे खरं आहे. शक्तिमान सुरू झाल्यापासूनच मला बच्चेकंपनीचं खूप प्रेम मिळालं. या मालिकेनंतर जिथे जिथे मी गेलो तिथे तिथे चिमुकले माझ्याभोवती गराडा घालतात. माझ्यासोबत फोटो आणि आॅटोग्राफ घेण्यासाठी त्यांची धडपड असते. आजही मला ते शक्तिमान म्हणूनच ओळखतात. हे सारं पाहून पुन्हा एकदा शक्तिमान घेऊन येण्याचा विचार पुढे आला.
प्रश्न : ‘शक्तिमान’ पुन्हा येणार म्हटल्यावर त्यासाठी काय खास तयारी केली आहे?
4काही खास अशी तयारी केलेली नाही. मात्र व्यायाम आणि इतर गोष्टी नित्यनियमाने सुरूच आहेत. बरेच जण माझ्या वयामुळं ही भूमिका कशी साकारणार असा प्रश्न विचारतील. पण माझ्या मते कोणतीही भूमिका साकारण्यासाठी वय हे महत्त्वाचं नसतं. तसंच वजन वाढवणं किंवा कमी करणं यावरही माझा फारसा विश्वास नाही. मात्र या भूमिकेसाठी जे जे करावे लागेल ते ते करण्याची तयारी आहे.
प्रश्न : नव्यानं येणाऱ्या ‘शक्तिमान’मध्ये काय काय बदल दिसतील?
4नव्या शक्तिमानमध्ये कोणताही बदल होणार नाही. १९९०च्या दशकातील मुलांसाठी हा एक प्रकारे नॉस्टॅलजियाच असेल. मात्र यामधील कोणतीही व्यक्तिरेखा बदलणार नाही. यांत पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओम्कारनाथ शास्त्री असेल, शक्तिमानही तसाच असेल आणि गीता विश्वाससुद्धा तीच असणार आहे. फक्त गीताला थोडं वजन कमी करण्यासाठी सांगितलं आहे. अन्यथा यात कोणताही बदल नसेल.
प्रश्न : ही मालिका कोणत्या वाहिनीवर प्रसारित केली जाईल?
4शक्तिमान ही मालिका दूरदर्शनवर गाजली होती. आता नव्यानं शक्तिमान आणताना कोणत्या चॅनलवर आणावी याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे. ती दूरदर्शनवर करावी की अन्य कोणत्या सॅटेलाईट चॅनलवर ते अजून ठरलेलं नाही. लवकरच त्याचाही निर्णय होईल.
प्रश्न : तुमचे खास फॅन म्हणजे बच्चेकंपनीला काय सांगाल?
4आजच्या युगातील बच्चेकंपनी खेळ विशेषत: मैदानी खेळ विसरत चालली आहे. त्यांचं जास्त मन हे स्मार्ट फोनमध्येच रमतं. त्यामुळं मी त्यांना सांगेन की स्मार्ट फोन वापरणं बंद करा. त्याचा अतिवापर चांगला नाही. मला वाटतं पालकांनीही यामध्ये विशेष लक्ष दिलं पाहिजे. मुलांचं लहानपण हरवू देऊ नका.

Web Title: 'Shaktiman' is returning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.