शाहरूखच्या ‘फॅन’चा वेग कमीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2016 01:20 IST2016-04-19T01:20:19+5:302016-04-19T01:20:19+5:30
किंग खानचे फॅन्स सुपरस्टार आणि फॅन (चाहता) या दोघांतील नात्यावर बेतलेला फॅन हा त्याचा चित्रपट डोक्यावर घेतील, अशीच अपेक्षा होती. शुक्रवारी प्रदर्शित होताना चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद वाईट नव्हता

शाहरूखच्या ‘फॅन’चा वेग कमीच
किंग खानचे फॅन्स सुपरस्टार आणि फॅन (चाहता) या दोघांतील नात्यावर बेतलेला फॅन हा त्याचा चित्रपट डोक्यावर घेतील, अशीच अपेक्षा होती. शुक्रवारी प्रदर्शित होताना चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद वाईट नव्हता. पहिल्या दिवशी १९ कोटी रुपयांच्या कमाईसह फॅॅनच्या ओपनिंगला या वर्षाची सर्वांत मोठी ओपनिंग म्हटले गेले. सुपरस्टार शाहरूख खानच्या यापूर्वीच्या अनेक चित्रपटांना पहिल्या दिवशी याहून कितीतरी अधिक चांगला प्रतिसाद मिळाला होता.
पहिल्या दिवशीचा प्रतिसाद पाहता येत्या दोन दिवसांत फॅनची कमाई ७० कोटींच्या वर जाईल, अशी आशा होती. सामान्यपणे शनिवारी व रविवारी प्रत्येक चित्रपटाच्या कमाईचे आकडे वाढलेले असतात. त्यामुळे फॅन सहज ७० कोटींपर्यंत मजल मारेल, असे वाटत होते. मात्र, फॅनला येथेच झटका बसला. शुक्रवारच्या १९ कोटी रुपयांच्या कमाईनंतर शनिवारी चित्रपटाने १८ कोटी कमावले, तर रविवारी त्याची कमाई १७ कोटींच्या आसपास राहिली. म्हणजेच फॅनच्या कमाईत शुक्रवारनंतर घट होत गेली. सामान्यपणे एखाद्या मोठ्या चित्रपटाबाबत असे होत नाही. पहिल्या तीन दिवसांसह पहिल्या आठवड्याअखेरीस फॅनचे कलेक्शन ५२ कोटी राहिले. शाहरूखच्या वलयाच्या मानाने हे आकडे कमीच आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीवर ८० कोटी, तर प्रसिद्धीवर २० कोटींहून अधिक खर्च झाला आहे. फॅनवर जेवढा खर्च झाला तेवढी तो कमाई करेल याबाबतही आता शंका वाटू लागली आहे. एक काळ असा होता की, किंग खानचे चित्रपट ३ दिवसांतच १०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचत होते. बॉक्स आॅफिसवर एकीकडे फॅनची ही स्थिती होती. तर खास मुलांसाठी तयार झालेल्या ‘जंगल बुक’ चित्रपटाची मात्र बॉक्स आॅफिसवर धूम सुरू आहे. फॅन प्रदर्शित होण्याचा या चित्रपटावर फारसा परिणाम झाला नाही. पहिल्या आठवड्याअखेर ४० कोटींच्या कमाईसह जोरदार सुरुवात करणाऱ्या या चित्रपटाने घोडदौड सुरूच ठेवली व दुसऱ्या आठवड्याअखेरीस म्हणजे १० दिवसांत १०२ कोटी रुपये कमावून १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश मिळवला. याच आठवड्यात आणखी एक चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे.
अक्षयकुमारचा चित्रपट ‘एअरलिफ्टने’ पुढे सरकत १०० कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे आर बाल्की यांचा ‘की अॅण्ड का’ हा चित्रपट ५० कोटींचा आकडा ओलांडण्यात यशस्वी ठरला आहे.