शाहरूख-भन्साळींमध्ये डिसेंबरमध्ये होणार व्यावसायिक संघर्ष!
By Admin | Updated: June 10, 2015 03:52 IST2015-06-10T03:52:37+5:302015-06-10T03:52:37+5:30
शाहरूख खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यामध्ये पुन्हा एकदा व्यावसायिक संघर्ष निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे़

शाहरूख-भन्साळींमध्ये डिसेंबरमध्ये होणार व्यावसायिक संघर्ष!
मुंबई : शाहरूख खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यामध्ये पुन्हा एकदा व्यावसायिक संघर्ष निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे़ याचे कारणही तसेच आहे़ शाहरूखचा ‘दिलवाले’ आणि भन्साळींचा ‘बाजीराव मस्तानी’ या दोन्ही चित्रपटांचे प्रदर्शन नाताळमध्ये होणार आहे़ तशी घोषणा भन्साळींनी केली आहे. त्यामुळे संघर्ष पुन्हा एकदा अटळ आहे.
आठ वर्षांपूर्वी (२००७) किंग खानच्या ‘ओम शांती ओम’ची टक्कर भन्साळींच्या ‘सांवरिया’शी झाली होती़ ‘सांवरियां’ बॉक्स आॅफिसवर अपयशी ठरला व ‘ओम शांती ओम’ खूपच यशस्वी ठरला होता. हा व्यावसायिक संघर्ष एवढा तीव्र होता की दोघांनीही एकमेकांविरुद्ध अपशब्द वापरायलाही मागेपुढे बघितले नव्हते. दोघांनीही जणू मागे सरकायचेच नाही, असे ठरविले होते.
शाहरूख खानने भन्साळींनी दिग्दर्शित केलेल्या ‘देवदास’मध्ये काम केले होते. ‘देवदास’ तयार होत असतानाच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते, असे समजते. हेच मतभेद नंतर ‘ओम शांती ओम’ व ‘सांवरिया’च्या प्रदर्शना वेळी टोकाला गेले होते. ‘दिलवाले’ आणि ‘बाजीराव मस्तानी’तील संभाव्य टकरीमुळे बॉलिवूडमध्ये सध्या वातावरण तापलेले आहे. शाहरूख खानच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, ‘दिलवाले’ प्रदर्शित करण्याची तारीख बदलली जाण्याची शक्यता नाही. भन्साळींच्या वर्तुळातून तारखेबद्दल अजून काहीही सांगण्यात आलेले नाही. संघर्षाची वेळ येणार नाही यासाठी खान या वेळी बराच प्रयत्न करील; कारण टक्कर झाली तर त्याच्या चित्रपटाचेही नुकसान होऊ शकते, असे समजते.
‘दिलवाले’चे दिग्दर्शन ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या रोहित शेट्टीचे असून, त्यात शाहरूख खान आणि काजोल ही लोकप्रिय जोडी आहे. संजय लीला भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’मध्ये रणवीर सिंह, प्रियंका चोप्रा व दीपिका पदुकोन यांच्या भूमिका आहेत. (प्रतिनिधी)