अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सात मराठी चित्रपटांची घोषणा; मराठमोळ्या रसिकांना मोठी मेजवानी

By संजय घावरे | Published: May 10, 2024 10:36 PM2024-05-10T22:36:06+5:302024-05-10T22:36:48+5:30

मागच्या महिन्याभरापासून तिकिटबारीवर चांगली कमाई करणाऱ्या मराठी सिनेसृष्टीने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तब्बल सात नवीन मराठी चित्रपटांची घोषणा केली आहे.

Seven Marathi films announced on the occasion of Akshaya Tritiya; A big treat for Marathmola lovers | अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सात मराठी चित्रपटांची घोषणा; मराठमोळ्या रसिकांना मोठी मेजवानी

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सात मराठी चित्रपटांची घोषणा; मराठमोळ्या रसिकांना मोठी मेजवानी

संजय घावरे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मागच्या महिन्याभरापासून तिकिटबारीवर चांगली कमाई करणाऱ्या मराठी सिनेसृष्टीने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तब्बल सात नवीन मराठी चित्रपटांची घोषणा केली आहे. यात अशोक सराफ, सई ताम्हणकर, प्रसाद ओक, आदिनाथ कोठारे, स्पृहा जोशी, प्राजक्ता माळी, प्रथमेश परब, संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव अशा मराठीतील दिग्गज कलाकारांच्या सिनेमांचा समावेश आहे.

यंदाचा अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त मराठी सिनेसृष्टीने चांगलाच कॅश केला आहे. या मुहूर्तावर 'फुलवंती', 'अष्टपदी', 'येरे येरे पावसा ३', 'शक्तिमान', 'मुंबई लोकल', 'लाईफ लाईन', 'गुलकंद' या सात चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे. हे सर्वच चित्रपट वेगवेगळ्या विषयांवर आधारलेले आहेत.

रंगणार… पखवाज आणि घुंगरांची जुगलबंदी... आपल्या अदांनी घायाळ करायला येतेय 'फुलवंती' असे म्हणत प्राजक्ता माळीने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे. यात फुलवंतीच्या भूमिकेत कोण दिसणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. प्रथमच दिग्दर्शन करणाऱ्या स्नेहल तरडेच्या या चित्रपटाचे संवाद प्रवीण तरडेने लिहिले आहेत.

'बाबा तू होऊ शकतोस सुपरहिरो?' असे म्हणत आदिनाथ कोठारे आणि स्पृहा जोशी यांचा 'शक्तिमान' येणार आहे. प्रकाश कुंटेच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात प्रियदर्शन जाधव, इशान कुंटे, विक्रम गायकवाड आदींच्याही भूमिका आहेत.

दोन भागांनी बक्कळ कमाई केल्यानंतर संजय जाधवच्या दिग्दर्शनाखाली 'ये रे ये रे पावसा ३' येणार आहे. या चित्रपटासाठी संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडीत, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात हे कलाकार एकत्र आले आहेत.

प्रथमेश परबने प्रभादेवीतील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन 'मुंबई लोकल' चित्रपटाची घोषणा केली. यात प्रथमेशसोबत ज्ञानदा रामतीर्थकरसोबत असून, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे यांच्याही भूमिका आहेत.

आधुनिक विज्ञान आणि जुन्या रीतिरिवाजांच्या संघर्ष या संकल्पनेवरील 'लाईफ लाईन'मध्ये महाराष्ट्रभूषण अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर प्रमुख भूमिकेत आहेत. सोबतीला हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे, समीरा गुजर आहेत. साहिल शिरवैकर दिग्दर्शित या चित्रपटातील गीतांना ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की संगीत लाभले आहे.

उत्कर्ष जैन यांच्या दिग्दर्शनाखाली 'अष्टपदी' हा चित्रपट तयार होणार असून, लवकरच कलाकारांची नावे घोषित करण्यात येणार आहेत. आजीवासन स्टुडिओत 'तू सुखकर्ता विघ्न  हर्ता  दे स्वरदान गणपती...' या गणेशगीताच्या रेकॉर्डिंगने मुहूर्त आणि घोषणा करण्यात आली आहे. उत्कर्ष जैन आणि महेंद्र पाटील या चित्रपटाचे निर्माते आहेत.

'धर्मवीर'च्या रूपात अपार लोकप्रियता मिळवलेल्या प्रसाद ओकचा 'गुलकंद' चित्रपट येणार आहे. याबाबतचा व्हिडिओ प्रसादने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात प्रसादसोबत सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, वनिता खरात, जुई भागवत, तेजस राऊत आदी कलाकार आहेत. लेखक सचिन मोटे आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी आहेत.

Web Title: Seven Marathi films announced on the occasion of Akshaya Tritiya; A big treat for Marathmola lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.