अपयशी चित्रपटांची मालिका सुरूच
By Admin | Updated: November 3, 2015 01:43 IST2015-11-03T01:43:03+5:302015-11-03T01:43:03+5:30
तसे पहायला गेले, तर गेल्या शुक्रवारी ‘चार्ल्स’, ‘तितली’ आणि ‘गुड्डू’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास यापैकी एकही चित्रपट

अपयशी चित्रपटांची मालिका सुरूच
तसे पहायला गेले, तर गेल्या शुक्रवारी ‘चार्ल्स’, ‘तितली’ आणि ‘गुड्डू’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास यापैकी एकही चित्रपट बॉक्स आॅफिसवर तग धरू शकला नाही. एक चार्ल्स शोभराजच्या जीवनावरील चित्रपट होता, तर दुसरीकडे ‘गुड्डू की गन’ ही सेक्स कॉमेडी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळवलेला ‘तितली’ होता. पहिल्या दोन दिवसांतच ‘मैं और चार्ल्स’, ‘गुड्डू की गन’ गुंडाळला गेला. ‘तितली’ने कसाबसा दोन दिवस संघर्ष केला. मात्र, त्यानंतर तीदेखील तग धरू शकली नाही. ‘तितली’ने पहिल्या आठवड्यात एक कोटी रुपयांच्या जवळपास कमाई करण्यात
यश मिळविले. मात्र, रणदीप हुडा (चार्ल्स) आणि कुणाल खेमू (गुड्डू) यांना प्रेक्षकांची पसंती मिळवता आली नाही. अशा प्रकारे तिन्ही चित्रपट प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांतच काहीही भरीव न करता, फ्लॉपच्या यादीत दाखल झाले.
नवे चित्रपट न चालल्याचा फायदा यापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात होती, पण तसे काही झाले नाही. विकास बहल यांच्या ‘शानदार’ या चित्रपटालाही याचा लाभ झाला नाही. पहिल्या चार दिवसांत ३० कोटी रुपयांचा व्यवसाय करून चांगली सुरुवात केलेल्या ‘शानदार’ची पावले नंतर अडखळली. हा चित्रपट दुसऱ्या सप्ताहापर्यंत ४० कोटींचाच व्यवसाय करू शकला. म्हणजेच पुढील सात दिवसांत या चित्रपटाने केवळ दहा कोटींचाच व्यवसाय केला. चित्रपट व्यवसायातील तज्ज्ञांनी ‘शानदार’ला अयशस्वी चित्रपटांच्या यादीत टाकले आहे. ‘शानदार’च्या अपयशाने सर्वांना चकित केले, तर ‘प्यार का पंचनामा- २’ च्या यशानेही काही कमी चकित केले नाही.
नवे चेहरे घेऊन तयार केलेल्या या चित्रपटाने जोरदार सुरुवात करत, आतापर्यंत ५० कोटींहून अधिक गल्ला जमविला आहे. ५३ कोटींच्या व्यवसायानंतरही या चित्रपटाचा व्यवसाय इतर चित्रपटांहून चांगला मानला जात आहे. या चित्रपटासोबतच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘वेडिंग पुलाव’ची चव तर पहिल्याच दिवशी खराब झाली होती. त्याच्या निर्मात्याला फार मोठे नुकसान सोसावे लागले आहे.
गेल्या शुक्रवारप्रमाणेच या शुक्रवारीही नव्या चित्रपटांची गर्दी होणार आहे. यावेळी सहा नवे चित्रपट झळकतील, परंतु त्यात आशा बाळगावी, असा एकही चित्रपट नाही. त्यामुळे स्पष्टच आहे की,
येत्या आठवड्यातही बॉक्स आॅफिसवरील वातावरण शांत-शांत असेल.
टॉप पाच चित्रपट
तितली- फ्लॉप
मैं और चार्ल्स- फ्लॉप
गुड्डू की गन- फ्लॉप
शानदार- फ्लॉप
प्यार का पंचनामा २- हिट