सतीश झाला ‘बृहन्मुंबई श्री’
By Admin | Updated: December 12, 2015 02:05 IST2015-12-12T02:05:23+5:302015-12-12T02:05:23+5:30
विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात ९ व्या मुंबई उपनगर जिल्हास्तरीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडल्या. हौशी शरीरसौष्ठव सेवा संस्थेच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते

सतीश झाला ‘बृहन्मुंबई श्री’
मुंबई : विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात ९ व्या मुंबई उपनगर जिल्हास्तरीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडल्या. हौशी शरीरसौष्ठव सेवा संस्थेच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत जुहू व्यायामशाळेच्या सतीश मालुसरेने पीळदार शरीरयष्टीच्या जोरावर दमदार प्रदर्शन करत ‘यशवंत सावंत स्मृती चषक बृहन्मुंबई उपनगर श्रेष्ठ’ या चषकावर नाव कोरले.
माजी महापौर डॉ. रमेश प्रभू यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. शरीरसौष्ठव स्पर्धेत ६ किताबांसाठी २६५ स्पर्धकांमध्ये लढत झाली. स्पर्धेत प्रथमच परीक्षणाचे काम कागदोपत्री न करता अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करून टॅबमध्ये करण्यात आले. आमदार पराग अळवणी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेत ‘बृहन्मुंबई उपनगर श्री’ किताब जुहू व्यायामशाळेच्या किरण राजपूतने मिळवला. ‘बृहन्मुंबई उपनगर उदय’ या किताबावर सांताक्रूझ पश्चिमेकडील शिवसाई व्यायाम मंदिरच्या मन्सुर गफार मुकादमने तर ‘बृहन्मुंबई उपनगर किशोर’ या किताबावर चेंबूर येथील प्रेरणा जिमकोच्या सागर बाळू रोकडेने आपले नाव कोरले. ‘बृहन्मुंबई उपनगर कुमार’ गटात घाटकोपर, तेरवणकर जिमकोच्या सागर खरातने वर्चस्व राखत बाजी मारली.
हौशी शरीरसौष्ठव सेवा संस्थेच्या वतीने प्रथमच मेन्स फिटनेस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ४५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेतील विजेत्यांना इंडियन फिटनेस अॅडबॉडी बिल्डर्स महासंघ आणि शरीरसौष्ठव सेवा संस्थेच्या अध्यक्षांच्या वतीने रोख बक्षीस आणि भेटवस्तूंचे वाटप या वेळी करण्यात आले. (क्रीडा प्रतिनिधी)