संजय दत्तच्या अडचणीत वाढ, कोर्टानं बजावलं अटक वॉरंट
By Admin | Updated: April 17, 2017 13:24 IST2017-04-15T20:03:13+5:302017-04-17T13:24:24+5:30
बॉलिवू़डचा खलनायक अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा अडचणीत सापडणार असल्याचे दिसत आहे

संजय दत्तच्या अडचणीत वाढ, कोर्टानं बजावलं अटक वॉरंट
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - बॉलिवू़डचा खलनायक अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा अडचणीत सापडणार असल्याचे दिसत आहे. शनिवारी मुंबईतील एका न्यायालयाने सिने-निर्माता शकील नुरानी यांना धमकावल्याप्रकरणी संजय दत्तविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण केल्यानंतर अभिनेता संजय दत्त कोणत्या-न-कोणत्या तरी वादात सापडताना दिसत आहे. आता निर्माता शकील नुरानी धमकी प्रकरण वाद पुन्हा नव्याने समोर आले आहे. संजय दत्तनं "जान की बाजी" सिनेमामध्ये काम करण्यासाठी 50 लाख रुपये अॅडवान्स घेतले होते. मात्र काही दिवसांनी संजयनं सिनेमाच्या पुढील शुटिंगसाठी तारखा दिल्या नाहीत, असा आरोप करत नुरानी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती.
याप्रकरणी नुरानी यांनी सुरुवातील "द इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन"(IMPPA)कडेही संजय दत्तविरोधात तक्रार केली होती. यावर संजय दत्तनं 15 दिवसांच्या आत नुरानी यांना 30 दिवसांच्या शुटिंगसाठी तारखा द्याव्यात किंवा 1.53 कोटी रुपयांची भरपाई करावी, असे IMPPA ने आदेश दिला होता. यानंतर संजय दत्तच्या सांगण्यावरुन कराची आणि दुबई येथून धमकीचे कॉल आल्याचा आरोपही नुरानी यांनी केला होता. दरम्यान, या खटल्यात महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून संजय दत्तला जामीन मिळाला होता.
त्यामुळे IMPPA चा आदेश संजय दत्तला लागू करावा यासाठी नुरानी यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. संजय दत्तच्या पाली हिल येथील फ्लॅटवर टाच आणून रक्कम वसूल करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी कोर्टाकडे केली होती. मात्र मुंबई हायकोर्टाकडून संजय दत्तला दिलासा मिळाला. IMPPAचा आदेश याठिकाणी लागू होत नाही कारण संजय त्या संस्थेचा सदस्यच नाही, असे सांगत कोर्टान नुरानी यांची मागणी फेटाळून लावली होती.
मात्र, या प्रकरणी आता अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्याने संजय दत्तच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
Non bailable warrant issued against Sanjay Dutt over alleged threat to filmmaker Shakil Noorani. (File pic) pic.twitter.com/NrZMwRv78D— ANI (@ANI_news) April 15, 2017