'साथिया'फेम अभिनेत्री संध्या मृदुलला मिळेना काम; म्हणाली, "भाई, हा काय नवीन सीन आहे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 10:41 IST2025-10-25T10:39:34+5:302025-10-25T10:41:24+5:30
अभिनेत्रीने गंमतीशीर अंदाजात सांगितला इंडस्ट्रीतला प्रकार

'साथिया'फेम अभिनेत्री संध्या मृदुलला मिळेना काम; म्हणाली, "भाई, हा काय नवीन सीन आहे..."
'साथिया' सिनेमातील राणी मुखर्जीच्या मोठ्या बहिणीची भूमिका करणारी अभिनेत्री आठवतेय?ती आहे संध्या मृदुल. संध्याने 'हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड' सिनेमातही काम केलं. तिच्या अभिनयाचं कायमच कौतुक झालं. मात्र तरी फारशा प्रोजेक्ट्समध्ये दिसली नाही. आता तिने इंडस्ट्रीवर आपला राग व्यक्त केला आहे. अभिनय नाही तर फॉलोअर्स बघून आजकाल कामं मिळत आहेत. फॉलोअर्स कमी असल्याने काम मिळत नसल्याचा तिने खुलासा केला आहे.
संध्या मृदुलने सिनेमांसोबतच टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. तिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत मनातील राग व्यक्त केला आहे. ती म्हणाली, "एक नवीनच सीन आहे की जर तुमचे सोशल मीडियावर जास्त फॉलोअर्स नसतील तर काम मिळणार नाही. भाई, जर कामच मिळालं नाही तर माणूस प्रसिद्ध कसा होईल? जर प्रसिद्धच झाला नाही तर फॉलोअर्स कसे वाढतील? फॉलोअर्स नाही वाढले तर तो कसा लोकप्रिय होईल आणि काम तरी कसं मिळेल? तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतेय. किती असमंजस आहे हे."
ती पुढे म्हणाली, "माझ्याकडे आधीपासून जे काम होतं तेही आता मी गमावलं आहे. कारण माझे फॉलोअर्स कमी आहेत. वर माझी मॅनेजर मला म्हणते की 'मॅम तुमचा लूक श्रीमंत व्यक्तीचा वाटतो त्यामुळेही तुम्हाला काम मिळत नाहीये. तुम्ही श्रीमंत दिसता.' भाई, माझा लूक श्रीमंतासारखा असेल, पण मी श्रीमंत नाही..कारण कामच मिळालं नाही तर फॉलोअर्स वाढणार नाही, मी लोकप्रिय होणार नाही आणि मला पैसाही मिळणार नाही. त्यामुळे माझा लूकच श्रीमंत आहे मी नाही. कृपया माझी मदत करा."
याआधी इतरही काही सेलिब्रिटींनी या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. आता संध्याच्या या अपीलनंतर तिला काम ऑफर होतं का हे बघणं महत्वाचं आहे.