सलमान-जॅकलिन पुन्हा एकत्र
By Admin | Updated: June 1, 2017 15:02 IST2017-06-01T15:02:46+5:302017-06-01T15:02:46+5:30
सलमान आता पुन्हा एकदा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीससोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

सलमान-जॅकलिन पुन्हा एकत्र
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1- अभिनेता सलमान खान सध्या ट्यूबलाइट या त्याच्या आगामी सिनेमात व्यस्त आहे. यासोबतच टाइगर जिंदा है या सिनेमाचं शूटिंगही सलमान करतो आहे. या सिनेमातून सलमान आणि कतरीनाची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. तर दुसरीकडे सलमान आता पुन्हा एकदा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीससोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याआधी "किक" या सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं. नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूजाच्या आगामी सिनेमात हे दोघं जण एकत्र काम करणार आहेत. हा सिनेमा डान्सवर आधारीत असेल. पहिल्यांदाच सलमान प्रेक्षकांना डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. रेमो डिसूजाचा हा सिनेमा एबीसीडी या सिनेमाचा तीसरा भाग आहे.
अभिनेता सलमान खान सध्या टाइगर जिंदा है या सिनेमाचं शूटिंग करतो आहे. ते संपल्यावर रेमोच्या सिनेमाचं शूट सुरू केलं जाणार आहे. रेमो डिसूजाने या सिनेमा संदर्भात जॅकलिनसोबत चर्चा केली आहे. जॅकलिनला सिनेमाची कन्सेप्ट आवडली असल्याची माहिती मिळते आहे. जॅकलिन सध्या भारताबाहेर आहे ती भारतात परतल्यावर रेमोकडून तीला स्क्रिप्ट सांगितली जाणार आहे.
रेमो डिसूजा दिग्दर्शित "एबीसीडी 3" या सिनेमात वडील आणि मुलीचं भावनिक नातं दाखविलं जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सलमान यात तेरा वर्षाच्या मुलीच्या वडीलांची भूमिका साकारतो आहे. तर जॅकलिन डान्स टीचरच्या भूमिकेत दिसेल. या सिनेमाचं शूटिंग सुरू होण्याआधी भूमिकेचा सराव सलमान करणार आहे आणि त्यानंतरच शूटिंगला सुरूवात होइल.
एबीसीडी या सिनेमाला बॉक्सऑफिसवर चांगलं यश मिळालं होतं. वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या एबीसीडी 2 ने 100 कोटींचा गल्ला केला होता. आता एबीसीडी 3 कसा असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.